दिल्ली : अभिनय, लेखन आणि कवितांमधून रसिकांची मनं जिंकणारा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे अलीकडेच दिल्ली दौऱ्यावर होता. या दौऱ्यात त्याने भारताचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत गडकरींनी स्वतः लिहिलेलं India Aspires हे पुस्तक स्वाक्षरीसह संकर्षणला भेट दिलं.
संकर्षणने या भेटीचा फोटो आणि अनुभव सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सांगितलं की, “आज दिल्लीमध्ये आदरणीय नितीन गडकरी साहेबांची भेट झाली आणि त्या थोडक्याच वेळेत आमच्या गप्पा घर, माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि खवय्येगिरी अशा अनेक विषयांवर रंगल्या." सर, मनापासून धन्यवाद! ही भेट शक्य करून दिल्याबद्दल आमच्या मित्र अंकितचे विशेष आभार.”
या भेटीत मिळालेल्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर नितीन गडकरींनी स्वतः खास संदेश लिहून आपली स्वाक्षरी केली असून, त्याचा फोटोही संकर्षणने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. संकर्षणची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच गाजते आहे आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
संकर्षण कऱ्हाडे सध्या मराठी रंगभूमीवर सक्रीय असून, त्याचे नाटकं आणि कार्यक्रम प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू आहेत. संकर्षण व्हाया स्पृहा या त्याच्या आणि अभिनेत्री स्पृहा जोशीच्या कार्यक्रमाला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. तसेच नियम व अटी लागू आणि कुटुंब किर्रतन ही त्याची नाटकेही हाऊसफुल्ल सुरू आहेत.