मुंबई: प्रसिद्ध यूट्यूब चॅनेल रेड सॉईल स्टोरीजच्या शिरीष गवस यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांना दुर्धर असा आजार झाला होता. त्यातच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. रेड सॉईल स्टोरीज हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले यूट्यूब चॅनेल कोकणच्या निसर्गरम्यतेचे दर्शन घडवणारे तसेच आपल्या मातीतील रेसिपीजना जगासमोर आणण्याचे काम करत होते. या चॅनेलच्या माध्यमातून शिरीष आणि पूजा हे लाडके जोडपे समोर आले होते. या चॅनेलला जगभरातून पसंती मिळत होती. देशातच नव्हे तर देशाबाहेरही या चॅनेलला पसंती दिली जात होती.
सर्व काही सुरळीत सुरू असतानाच अचानक एक दिवस शिरीष गवस यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. या बातमीने साऱ्यांनाच धक्का दिला. शिरीष गवस यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अनेकांनी याचे भांडवल केले. व्ह्यूज मिळवण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवण्यात आले. त्यातून शिरीष गवस यांच्या मृत्यूबाबत चुकीची माहिती पसरवली जात होती. तीन महिन्यानंतर पहिल्यांदा आता शिरीष गवस यांच्या पत्नी पूजा गवस यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिरीष यांच्या मृत्यूचे सत्य समोर आणले आहे. शिरीष यांच्या तब्येतीबाबत नेमके काय घडले याची इत्यंभूत माहिती देणारा व्हिडिओ समोर आणला आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी शिरीष गवस यांचे आजारपण, उपचार, त्यासाठीचा त्यांचा प्रतिसाद आणि अचानक एक दिवस त्यांचे सोडून जाणे याबाबत सांगितले आहे. तसेच शिरीष यांचे स्वप्न असलेले हे यूट्यूब चॅनेल त्या सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.