बनावट कर्ज, कागदपत्रांमध्ये फेरफार; ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या निधीचा उद्देशबाह्य वापर करून केलेला आर्थिक अपहार उघडकीस
फलटण: फलटण येथील यशवंत सहकारी बँकेत एका अत्यंत धक्कादायक आणि मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष, संचालक आणि अधिकाऱ्यांनी मिळून तब्बल ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह एकूण ५० जणांविरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील सहकार क्षेत्रात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
या गंभीर प्रकरणाची तक्रार पुण्यातील शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी दाखल केली आहे. त्यांनी सादर केलेल्या सनदी लेखापरीक्षण अहवालात बँकिंग व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या चालू आर्थिक वर्षातील व्यवहारांसह, १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत कार्यरत असलेल्यांवरही अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
लेखापरीक्षणात उघड झालेल्या माहितीनुसार, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ आणि काही अधिकाऱ्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे संगनमत केले. त्यांनी बँकेचा निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी बनावट कर्ज प्रकरणे तयार केली, खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर केली. धक्कादायक बाब म्हणजे, कर्ज वितरणासाठी कोणतेही आवश्यक तारण (Security) न घेता हेतुपुरस्सरपणे कर्जे वाटली गेली.
एवढेच नव्हे तर, जुनी थकलेली कर्जाची खाती बंद झाल्याचे कागदोपत्री दाखवून, त्याऐवजी नवी खाती उघडण्यात आली आणि त्याद्वारे बँकेचा कोट्यवधींचा निधी थेट तृतीय पक्षांकडे (Third Parties) वळवण्यात आला. तसेच, महत्त्वाच्या दस्तऐवजांमध्ये फेरफार करणे आणि खोट्या नोंदी तयार करून निधीचा उद्देशबाह्य वापर करणे असे अनेक गंभीर गैरप्रकार या आरोपींनी केले, असा स्पष्ट आरोप तक्रारीत नमूद आहे.
या घोटाळ्यात तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह संचालक मंडळातील नरेंद्र भोईटे, रवींद्र टोणपे, चंद्रकांत चव्हाण, अनिल चव्हाण, सुनील पावसकर, सुधीर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी, अवधूत नाटेकर, डॉ. नचिकेत वाचासुंदर, गणपतराव निकम, नानासो पवार, पांडुरंग करपे, स्नेहन कुलकर्णी, कल्पना गुणे, महेशकुमार जाधव, अजित निकम, गोपीनाथ कुलकर्णी, जयवंत जगदाळे, डॉ. प्रदीपकुमार शिंदे, प्रसाद देशपांडे, सुहास हिरेमठ आदींची नावे प्रमुख आरोपींच्या यादीत आहेत.
त्याचबरोबर बँकेचे महत्त्वाचे अधिकारी असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, धनंजय डोईफोडे, वैशाली मोकाशी आणि शाखा व्यवस्थापक वैशाली पावशे, केशव कुलकर्णी यांचाही या गुन्ह्यात थेट समावेश आहे. विशेष म्हणजे, शेखर चरेगावकर यांचे नातेवाईक शार्दूल उर्फ मुकुंद चरेगावकर, विठ्ठल उर्फ शौनक कुलकर्णी, राही कुलकर्णी, संहिता कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, काशिनाथ कुलकर्णी, सूरज गायधनी, विभीषण सोनावणे, दिनेश नवळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, एकूण १९५ बोगस कर्ज खाती उघडकीस आली आहेत. आरोपींनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून बँकेचे ठेवीदार आणि सभासद यांच्या हिताला मोठा तडा दिला आहे. लेखापरीक्षण अहवालात ही संपूर्ण साखळी स्पष्ट झाल्यानंतर, फलटण शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या गंभीर गुन्ह्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी लवकरच या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) देखील समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.