प्रवाशांसाठी एसटी महामंडळाची सुविधा
रायगड एसटी महामंडळाने दिवाळी धमाका म्हणून ५० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. या जादा गाड्यांचा जवळपास २० हजार ८८० किलोमीटर प्रवास होणार आहे. यंदा दिवाळी सुट्टीसाठी एसटी महामंडळाने राज्य मध्य कार्यालय, प्रादेशिक कार्यालय आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतल्याने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यंदा दीपावलीमध्ये १८ऑक्टोबर धनत्रयोदशी, २० ऑक्टोबर नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नान, २१ ऑक्टोबर लक्ष्मीपूजन, २२ ऑक्टोबर दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा तसेच २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज असे महत्वाचे सण असल्याने याशिवाय दीपावलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुट्ट्या असल्याने प्रामुख्याने १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एसटी महामंडळाने ही जादा वाहतूक सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
रायगड जिल्ह्यात असणारे गडकिल्ले, लाभलेला सागरी किनारा, धार्मिक स्थळे आदी गोष्टींमुळे राज्यभरातून याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्याने ही जादा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये राज्य मध्य कार्यालयाच्या माध्यमातून १०८४२.२ किलोमीटर प्रवासासाठी २५ जादा फेऱ्या, प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून २६९९.९ किलोमीटर प्रवासासाठी ७ जादा फेऱ्या आणि विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून ७३३८ किलोमीटर प्रवासासाठी १८ जादा फेऱ्या अशा एकूण २० हजार ८८०.१ किलोमीटर प्रवासासाठी एसटी महामंडळाने ५० जादा फेऱ्यांचे नियोजन रायगड जिल्ह्यासाठी केले आहे.
दरम्यान दिवाळी सुट्टीचा विचार करता १५ ऑक्टोबरपासूनच अगदी सुट्टी संपेपर्यंत म्हणजेच पाच नोव्हेंबरपर्यंत एसटी महामंडळाने आरक्षण सवलत सुरू ठेवली असून जाहीर करण्यात आलेल्या जादा गाड्यांसह इतर नियमित पावणेदोनशेच्या आसपास फेऱ्या देखील सुरूच राहणार असल्याने एसटी प्रवासी समाधान व्यक्त
करत आहेत.