विंडहोक : क्रिकेट जगतात नामिबियाने एक मोठा उलटफेर केला आहे. नामिबियाने त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४ गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे.
या विजयामुळे नामिबियाने क्रिकेट जगतात एक मोठी नोंद केली आहे. हा सामना नामिबिया क्रिकेट ग्राउंड विंडहोक येथे खेळवण्यात आला होता.
क्विंटन डी कॉकचे पुनरागमन ठरले अपयशी
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विनटन डी कॉक (Quinton de Kock) या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला होता, पण तो केवळ १ धाव काढून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३४ धावा करू शकला. नामिबियाकडून रुबेन ट्रंपलमनने उत्कृष्ट गोलंदाजी केली, त्याने २८ धावा देऊन ३ बळी घेतले.
नामिबियाचा थरारक विजय
१३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने २० षटकांत ६ गडी गमावून १३८ धावा केल्या आणि ४ गडी राखून विजय मिळवला. नामिबियाला शेवटच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज होती. यष्टीरक्षक फलंदाज झेन ग्रीनने (Zane Green) चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
झेन ग्रीनने २३ चेंडूंमध्ये नाबाद ३० धावांची खेळी केली, तर कर्णधार गेरहार्ड इरास्मसने २१ धावांचे योगदान दिले. हा विजय नामिबियासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण नामिबियाने प्रथमच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे.