मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल) आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई मेट्रो-११ नवीन मेट्रो मार्गामुळे शहराच्या विस्तारणाऱ्या मेट्रो जाळ्यामध्ये भर पडणार आहे. मेट्रो-४ मार्गाचा विस्तार असलेल्या मेट्रो-११ प्रकल्पाला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. आणिक डेपो- वडाळा- गेटवे ऑफ इंडियाला जोडणारा हा प्रकल्प अंदाजे २३,४८७.५१ कोटी रुपये खर्चाचा आहे. या प्रकल्पाची योजना एका नवीन मेट्रो मार्गाची रचना, बांधकाम आणि कार्यान्वित करण्याची आहे, जी अत्यंत आवश्यक असलेली भूमिगत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून काम करेल.
प्रस्तावित असलेली मुंबई मेट्रो-११ दक्षिण मुंबईतील काही सर्वात वर्दळीच्या आणि गर्दीच्या भागातून जाईल, ज्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी होतील आणि त्याचबरोबर पर्यावरणपूरक, कार्यक्षम प्रवास पर्यायही उपलब्ध होईल. आणिक डेपोपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत १७.५१ किलोमीटर लांबीची ही मार्गिका शहराच्या सार्वजनिक वाहतूक नेटवर्कवर मोठा
परिणाम करेल.
एमएमआरसीएलने आधीच एक सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे, ज्यामध्ये मार्ग आणि बांधकाम पद्धतीची रूपरेषा दिली आहे. ही मेट्रो लाईन नागपाडा आणि भेंडी बाजार सारख्या महत्त्वाच्या भागातून जाईल, जे त्यांच्या उच्च लोकसंख्येची घनता आणि वाहनांच्या वाहतूक कोंडीसाठी ओळखले जातात. मुंबई मेट्रो-३ (कफ परेड वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आरे) प्रमाणेच मेट्रो ११ मध्ये देखील अॅट-ग्रेड आणि भूमिगत दोन्ही स्थानके असतील.
मुंबई मेट्रो ११ ही इतर अनेक मेट्रो मार्गाशी आणि वाहतूक व्यवस्थांशी धोरणात्मकरित्या जोडली जाईल, ज्यामुळे संपूर्ण शहरात अखंड प्रवासासाठी एक मजबूत नेटवर्क तयार होईल. मेट्रो ११ साठीचा कार डेपो १६ हेक्टर जमिनीवर पसरलेल्या आणिक-प्रतीक्षा नगर बेस्ट बस डेपो येथे असेल. या एकात्मिक विकास योजनेचे उद्दिष्ट सार्वजनिक वाहतुकीच्या इतर प्रकारांशी सुरळीत कामकाज आणि अखंड समन्वय सुनिश्चित करणे आहे.