मुंबई : मुंबईत सध्या कबूतरांमुळे उद्भवलेल्या आरोग्यविषयक समस्यांवरून मोठा गदारोळ सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबर रोजी जैन समुदायातर्फे एक विशेष धर्मसभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जैन मुनी निलेश यांनी ‘जन कल्याण पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. “आता आम्हालाही आमची संघटना हवी आहे. महापालिकेत आमचे उमेदवार उभे राहतील. कबुतरांची देखील पार्टी असावी. जसा शिवसेनेत वाघ आहे, तसं आमचं प्रतीक कबूतर असू शकतं,” असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर जैन मुनी कैवल्य रत्न महाराज यांनी वादग्रस्त विधान करत, “डॉक्टर आणि वैज्ञानिक मूर्ख असतात असं वाटतं. एक-दोन माणसे मेल्याने फार काही बिघडत नाही. रोज हजारो सामान्य नागरिक मरतात, त्यांचा विचार सरकार करत नाही,” असे संतापजनक मत मांडले. याचबरोबर, “जैन समाज सर्वाधिक कर भरणारा आहे,” असंही त्यांनी बोलताना म्हटले. त्यांच्या विधानांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचा संताप
शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. “ज्यांना कबुतरांमुळे त्रास झाला आणि त्यातून मृत्यू ओढवला, त्यांचा विचार या मुनींनी केलाय का? फुफ्फुसाच्या आजारांमुळे कित्येक लोक दगावतात. त्यांच्या घरी कबुतराचे फोटो आहेत का? ते कबुतरांची पूजा करतात का? प्रत्येक प्राणी पूजनीय नसतोच. घरात उंदीर आला तर आपण तो गणपतीचा वाहन म्हणून ठेवत नाही. त्यामुळे याप्रकारची विधाने गैरजबाबदार आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, या विषयावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही मनीषा कायंदेंनी केली.
जैन मुनींच्या वक्तव्यांवर राजकीय प्रतिक्रिया देताना अविनाश अभ्यंकर यांनी जैन समाजावर टीकास्त्र सोडलं. “कर भरता म्हणून मुंबईवर हक्क दाखवता का? मराठी माणूस मेहनतीने जगतो, कुणाला फसवून देश सोडून जात नाही. इतर प्रांतीयांना जागा दिली म्हणून मुंबईवर मालकी हक्क सांगणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “जर तुम्ही अहिंसावादी असाल आणि काही जण मेल्याने फरक पडत नसेल असं म्हणत असाल, तर तुमचं मत हास्यास्पद आहे. मग तुम्ही ज्या मंदिरात बसता, त्या मंदिराच्या जाळ्या काढून टाका. डॉक्टर, वैज्ञानिक हे मूर्ख नाहीत.”
मुंबईत कबुतरांमुळे वाढलेल्या आजारांवरून निर्माण झालेल्या वादात आता राजकारणाची भर पडली आहे. जैन समाजाकडून नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा, तसेच वादग्रस्त विधानांमुळे वातावरण तापले असून, या वादाचे राजकीय पडसाद पुढे कसे उमटतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.