दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी ’जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल जागरूक करणे हा आहे. जागतिक मानसिक आरोग्य दिन हा शारीरिक आरोग्याइतकंच मानसिक आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देणारा दिवस आहे. जगात सुमारे १५ टक्के लोक मानसिक समस्यांनी त्रस्त आहेत. एंग्झायटी आणि डिप्रेशन या सर्वात सामान्य मानसिक आरोग्य समस्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगात प्रत्येक ७ पैकी १ व्यक्ती या विकाराने त्रस्त आहे.
सुमारे २८ कोटींहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या एंग्झायटी डिसऑर्डरने त्रस्त आहेत. एंग्झायटीमध्ये व्यक्तीला अतिशय चिंता, भीती आणि तणावाची भावना येते. ही स्थिती सर्व वयोगटातील लोकांमध्ये आढळते. डिप्रेशन आणि एंग्झायटीवर उपचार शक्य आहेत. यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, औषधे आणि जीवनशैलीत बदल यांची गरज असते. योग्य सल्ला आणि उपचाराने व्यक्ती आपल्या जीवनात पुन्हा आनंद मिळवू शकते. ध्यान, योग, शारीरिक व्यायाम आणि सकारात्मक विचार हेदेखील मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
मानसिक आजाराचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही, तर त्यांच्या कुटुंबावर आणि समाजावरही होतो. यामुळे नात्यांमध्ये तणाव आणि सामाजिक अंतर वाढते. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त यावर जोर दिला जातो की, मानसिक आजाराला एका आजाराप्रमाणे स्वीकारावे आणि वेळेवर उपचार घ्यावेत.