मुंबई ( प्रतिनिधी) : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, वसई (जि.पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५३५४ सदनिका व ओरोस (जि.सिंधुदुर्ग), कुळगाव- बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता संगणकीय सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवार, दि.११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.
सदर सोडतीसाठी १,८४,९९४ अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह १,५८,४२४ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंग व म्हाडाच्या अधिकृत फेसबूक पेजवर करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीतील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायं ६.०० वाजेनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे.
तसेच विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतच संदेश त्यांनी अर्जासोबत नोंद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर तात्काळ प्राप्त होणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली. कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे. त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १७४६ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४१ तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.






