श्रीवर्धन (वार्ताहर) : श्रीवर्धन डेपोच्या बसला गोवा हायवेवरील सर्व थांबे देत असल्याने स्थानिक प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पनवेल व वडखळ बस स्थानकातून महामार्गावरील स्थानिक प्रवासी बसमध्ये चढत असल्याने श्रीवर्धन म्हसळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना उभे राहून किंवा इतर आगाराच्या बसने प्रवास करावा लागतो.
गाड्यांमध्ये आधीच प्रचंड गर्दी असताना देखील हायवेच्या थांब्यांवरील प्रवासी घेतले जातात. यामुळे श्रीवर्धनच्या प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत असून त्यात महिलांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच प्रवाशांमध्ये किरकोळ वाद सुद्धा निर्माण होतात. पनवेल पेन, पनवेल माणगाव, पनवेल महाड या बस विनावाहक विना थांबा चालवण्यात येतात. त्यामुळे या क्षेत्रातील स्थानिक प्रवाशांची जबाबदारी फक्त श्रीवर्धन आगारानेच का उचलावी? असा प्रश्न नागरिकांना उपस्थित केला आहे. आधीच दोन आगारातील अंतर जवळपास ६३ किमी तसेच २ तालुक्यातील प्रवाशांची जबाबदारी एकट्या श्रीवर्धन आगारावर असताना श्रीवर्धन आगारावर महामार्गावरील लोकल थांब्यांची जबाबदारी का टाकण्यात येते.
त्यामुळे श्रीवर्धन बस स्थानकाला अतिरिक्त देण्यात आलेले लोकल बसथांबे बंद करून न्याय द्यावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून महामंडळाकडे करण्यात येत आहे. श्रीवर्धन डेपोच्या बसगाड्या फक्त नियोजित थांब्यांवरच थांबाव्यात. यामुळे श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील स्थानिक प्रवाशांना आरामदायक व सुरक्षित तसेच आपल्या गावच्या बसने प्रवास करता येईल. त्यामुळे वेळ व पैशांची बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






