महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी १ जागा, तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा राखीव
अलिबाग : अलिबाग नगर परिषदेच्या २० जागांपैकी १० जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेच्या सभागृहात प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे उपस्थित होते. नगरपालिका शाळेमधील ४ मुलांनी आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या.
अलिबाग नगरपरिषदमध्ये १० प्रभागांमध्ये २० वार्ड असून, वॉर्ड क्र. ५ मध्ये अनुसूचित जातीची संख्या जास्त असल्याने एक जागा महिलेसाठी, तर दुसरी जागा सर्वसाधारणसाठी राखीव झाली. प्रभाग १ मध्ये १-अ : ना.म.प्र. सर्वसाधारण, १-ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग २ मध्ये २-अ : अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला, २-ब : सर्वसाधारण, प्रभाग तीनमध्ये ३-अ : ना.म.प्र. महिला, ३-ब : सर्वसाधारण, प्रभाग ४ मध्ये ४-अ : ना.म.प्र. महिला, ४-ब : सर्वसाधारण, प्रभाग ५ मध्ये ५-अ : अनुसूचित जाती महिला, ५-ब : सर्वसाधारण, प्रभाग ६ मध्ये ६-अ : ना.म.प्र. सर्वसाधारण, ६-ब : सर्वसाधारण महिला, प्रभाग ७ मध्ये ७-अ : सर्वसाधारण महिला, ७-ब : सर्वसाधारण, प्रभाग ८ मध्ये ८-अ : ना.म.प्र. महिला, ८-ब : सर्वसाधारण, प्रभाग ९ मध्ये ९-अ : अनुसूचित जमाती महिला, ९-ब : सर्वसाधारण, प्रभाग १० मध्ये १०-अ : अनुसूचित जमाती सर्वसाधारण, १०-ब : सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे. आरक्षण सोडतीवेळी अलिबाग नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
२०१६ मध्ये झालेल्या अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत ८ प्रभागांतून १७ वॉर्ड होते. नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या ही २० हजार ७४३ एवढी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ११९२ इतकी असून, अनुसूचित जमातींची लोकसंख्या २,७३५ इतकी आहे, यामुळे अनुसूचित जातीसाठी १ जागा महिलेसाठी राखीव झाली, तर अनुसूचित जमातीसाठी ३ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने सर्वांचे लक्ष नगराध्यक्ष पदाकडे लागले आहे.






