मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ॲप आधारित वाहतूक सेवेबाबतचे धोरण येत्या दोन दिवसांत जाहीर केले जाणार असून या धोरणामुळे ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाइक टॅक्सी चालवणाऱ्या संस्थांवर सरकारचे नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि या संस्थेकडे काम करणाऱ्या चालकांना न्याय मिळेल, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या वाहतुकीच्या उत्पन्नातील ८० टक्के परतावा चालकांना देण्याची सुधारणाही या धोरणात असणार आहे.
‘इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन’च्या प्रतिनिधींची विशेष बैठक सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरनाईक यांनी ही माहिती दिली. ‘ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाइक टॅक्सीसाठी सर्वसमावेशक धोरण नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असून त्याद्वारे प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे सरनाईक यांनी सांगितले.
या बैठकीला परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) किरण होळकर यांच्यासह आयएफएटीचे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.