महर्षी व्यास


(भाग तिसरा)


भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी


पांडवांनी केलेल्या राजसूर्य यज्ञाचे महर्षी व्यास मुख्य पुरोहित होते. पांडव वनवासात गेले, तेव्हा महर्षी व्यास त्यांना आवर्जून भेटायला गेले. सद्धर्माच्या पाठीशी स्वर्गीय दिव्य अस्त्रे हवीतच, या विचाराने व्यासांनी पांडवांना प्रतिस्मृती नामक विद्या दिली. या विद्येमुळे अर्जुनाला स्वर्गात सदेह जाता येऊन दिव्य अस्त्रे प्राप्त करता आली. महाभारतयुद्ध संपले. पांडव विजयी झाले. पण हस्तिनापुराच्या राजसिंहासनी बसायला युधिष्ठिराचे मन तयार होत नव्हते. युद्धात झालेल्या अपरिमित नरसंहाराने तो अत्यंत व्यथित झाला होता. त्याला महर्षी व्यासांनी खूप समजविले की मृत्यूसारख्या अपरिहार्य गोष्टीसाठी शोक करू नये. कोणीही एकमेकांसह अखंड राहू शकत नाही.


यथा काष्ठं च काष्ठं


समेयातां महादधौ


समेत्यव्यपेयातां तद्वद् भूतसमागमः ।। राजधर्म. २८.३६


जसे महासागरात पडलेली दोन लाकडे काही काळासाठी एकमेकांच्या जवळ येतात आणि लाटांच्या तडाख्यात विलग होतात, त्याप्रमाणे या लोकी जीवांचा संयोग-वियोग होत असतो, असे सांगून महर्षींनी युधिष्ठिराला मनःशांतीसाठी अश्वमेधयज्ञ करण्यास सांगितले. या यज्ञासाठी आता माझ्याजवळ वा माझ्या प्रजेजवळ पुरेसे धन नाही, असे युधिष्ठिर म्हणाला, तेव्हा महर्षी व्यासांनी त्याला उपाय सांगितला की, पूर्वी हिमालयात मरुतराजाने मोठा यज्ञ केला होता. त्यासाठी शिवाला प्रसन्न करून त्याने इतके अमाप धन प्राप्त केले की, यज्ञात सर्वांना दान करूनही बरेच धन अजून तेथेच पडून आहे, ते तुमच्या यज्ञाला उपयोगी पडेल. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे पांडवांनाही हिमालयातील त्या विशिष्ट पर्वतावर प्रचंड धन लाभले. श्रीकृष्णाची अवतारसमाप्ती झाल्यावर उद्ध्वस्तचित्त झालेल्या अर्जुनाचे महर्षी व्यासांनीच सांत्वन करून पांडवांनी आता महाप्रस्थानाची तयारी करावी, असे सुचविले. अशा प्रकारे कौरव-पांडवांच्या उदयापासून तर त्यांच्या शेवटापर्यंत महर्षी व्यासांचा प्रत्यक्ष सहभाग होता. कुरुवंशाचा हा इतिहास लिहून काढावा, असे त्यांनी ठरविले. कारण सत्य-असत्याच्या संघर्षात जरी असत्याचा उत्कर्ष होतोय, असे वाटले तरी अंतिम विजय सत्याचाच होतो, याचे सुस्पष्ट उदाहरण या इतिहासावरून लोकांच्या नजरेसमोर राहील, कुठल्याही पेंचप्रसंगी काय निर्णय घ्यावा, हे या इतिहासातल्या उदाहरणांवरून लोकांना कळून येईल. या इतिहासातल्या विवेचनावरून चारही पुरुषार्थांचे ज्ञान लोकांना होईल, कारण...


धर्मेच अर्थेच कामेच मोक्षेच भरतर्षभ


यदिहस्ति तदन्यत्र यन्नेहास्तितत् क्वचित् ।। म.आदी.अ.६२.५३


धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा चारही पुरुषार्थांविषयी या कुरुवंशाच्या इतिहासात जे आहे, ते इतरत्रही असू शकते, पण या इतिहासात जे पुरुषार्थांविषयीचे विवेचन नाही, ते अन्यत्र कुठेही नाही. समाजधर्म, स्त्रीधर्म, राजधर्म या सगळ्यांचे आकलन या इतिहासामुळे होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या विश्वाने आपल्या हृदयात जतन करून ठेवावे, असे प्रत्यक्ष भगवंतांनी गायलेले ब्रह्मज्ञान, योगशास्त्र यांचे दर्शन या इतिहासातून घडेल. तसेच भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला, अस्वस्थ मनाचे समाधान करण्यासाठी सांगितलेले विष्णुसहस्रनाम हेही या इतिहासात आले आहे म्हणून महर्षी व्यासांनी जय या नावाने कुरुवंशाचा इतिहास लिहिण्याचा संकल्प केला. तेव्हा त्याचे लेखनिक साक्षात ज्ञानदेवता गणराय झाले! पुढे या ग्रंथालाच महाभारत नाव मिळाले. वेद, पुराणे, ब्रह्मसूत्रे, महाभारत असे मोठमोठे ग्रंथप्रकल्प सिद्ध होऊनसुद्धा महर्षी व्यासांचे मन अशांत होते. त्यांच्या लक्षात आले होते की, आता कलियुग आले आहे, ज्ञानपिपासू लोक आपल्या उपरोक्त ग्रंथांकडे वळतील पण सर्वसामान्य जनतेला आपल्या जीवनसंग्रामात अशा ग्रंथाकडे बघण्याची फुरसत नाही. त्यांना फक्त अर्थ आणि काम हे दोनच पुरुषार्थ प्राप्त करायचे आहेत. आपण दोन्ही हाथ उभारून उंच स्वरात आवाहन करतोय, पण आपले म्हणणे कोणी ऐकत नाहीय...


ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष नच कश्चिच्छृणोति मे


धर्मादर्थश्च कामश्चकिमर्थंसेव्यते।। स्वर्गारोहणपर्व अ.५.६२


अरे बाबांनो, धर्माच्या मार्गाने वाटचाल केल्यामुळे मोक्ष तर प्राप्त होतोच, पण अर्थाचाही लाभ होतो आणि कामही तृप्त होते. असे परिपूर्ण फळ देणारा धर्ममार्ग तुम्ही लोक का नाही स्वीकारत? श्रीकृष्णाच्या चरित्र गायनाने लोकांना धर्ममार्गाचे आकलन होईल, या विचाराने महर्षी व्यासांनी भक्तीने ओतप्रोत अशा भागवत ग्रंथाचे लेखन केले. भागवतात श्रीविष्णूंच्या सर्व अवतारांची चरित्रे रसाळपणे आलेली आहेत. त्यात पूर्णावतार भगवान श्रीकृष्णाचे चरित्र अधिक विस्ताराने महर्षी व्यासांनी रंगविले आहे. श्रीकृष्णाने आपल्या अवतार समाप्तीआधी आपला मित्र उद्धव याला जे अजोड अध्यात्मज्ञान दिले, ते भागवतातल्या अकराव्या स्कंधात आले आहे. महर्षी व्यासांनी उच्च अध्यात्मिक वृत्तीचा पुत्र हवा म्हणून तपश्चर्या केली होती. भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाल्याने व्यासांना दिव्य पुत्राची प्राप्ती झाली. तेच शुकाचार्य होत. ऋषिपुत्राच्या शापाने मृत्यूच्या छायेत उभ्या असलेल्या परिक्षितास भागवतकथा सांगावी, असे महर्षी व्यासांनी शुकाचार्यांना सांगितले. या भागवत श्रवणाने परिक्षितराजा मुक्त झाला. अजूनही भागवत सप्ताहातून लोकांना भक्तिज्ञानाचे, धर्ममार्गाचे संजीवन मिळत असते.


आपल्या महान भारतीय संस्कृतीला संजीवन देणाऱ्या या थोर महर्षी व्यासांना शतशः नमन...!


anuradha.klkrn@gmil.com


Comments
Add Comment

अहंकाराचा वारा न लागो

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे अहंकाराचा वारा न लागो राजसा

जीवनाची आरती

ऋतुराज : ऋतुजा केळकर आरत्या

मोह

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य माणूस जन्माला आला की त्याचे आयुष्य सुरू होते ते अगदी मरेपर्यंत. त्या

बुद्धीला चालना

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै आपण घेतलेल्या विषयांपैकी परमेश्वर हा विषय,

कोजागिरी पौर्णिमा आज! दूध चंद्रप्रकाशात कधी ठेवाल? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

मुंबई: हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून विशेष महत्त्व

कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान