वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात ब्रिटीशांनी रॉयल भारतीय हवाई दल नावाने ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारताच्या स्वतंत्र हवाईदलाची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी ८ ऑक्टोबर हा दिवस भारतीय हवाई दल दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिन हिंडन हवाई दल तळावर साजरा करण्यात आला असून हवाईदलात कार्यरत असणाऱ्या स्त्रिपुरुषांच्या शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करण्यात आला. तसेच यावर्षीच्या उत्सवातील महत्त्वाचे म्हणजे ऑपरेशन सिंदूरला वाहिलेली विशेष आदरांजली! भारतीय वायुसेनेने कांगो ऑपरेशन, ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन पवन, ऑपरेशन कॅक्टस, ऑपरेशन सेसलिहार, ऑपरेशन पराक्रम इत्यादी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मोहिमा आजपर्यंत यशस्वी केल्या. याच यशाचे चित्रण करणारे हवाई दलावर आधारित चित्रपट ही प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकी काही चित्रपट असे आहेत जे तुम्ही आयुष्यात एकदा तरी पाहिलेच पाहिजेत.
उरी - द सर्जिकल स्ट्राईक : आदित्य धार दिग्दर्शित २०१९ सालचा उरी द सर्जिकल स्ट्राईक हा सत्य घटनेवर आधारीत हिंदी चित्रपट आहे. ज्यात विकी कौशल याने मुख्य भूमिका निभावली आहे. २०१६ साली काश्मिरच्या उरी भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक जवानांचा मृत्यू झाला होता. भारतीय जवानांनी या हल्ल्याचे उत्तर हवाई दलाच्या मदतीने दिले होते. या घटनेवर आधारीत हा चित्रपट आहे.
गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल : शरण शर्मा दिग्दर्शित २०२० सालचा हा चित्रपट हा आत्मचरित्रपर आधारित चित्रपट आहे. कारगिल युद्धादरम्यान लढाऊ क्षेत्रात उड्डाण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांचा प्रेरणादायी प्रवास यामध्ये दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट सक्सेना यांच्या तीव्र इच्छाशक्तीच्या बळावर प्रकाश टाकतो.
भूज: द प्राइड ऑफ इंडिया : अभिषेक दुधैया दिग्दर्शित २०२१ सालचा भूज: द प्राइड ऑफ इंडिया हा चित्रपट युद्धकाळातील भारतीय हवाई दलाच्या लवचिकतेचे महत्त्व सांगतो. ज्यात अभिनेते अजय देवगण यांनी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारली आहे. विजय कर्णिक यांनी १९७१ च्या युद्धादरम्यान गावातील ३०० महिलांना सोबत घेऊन बॉम्बस्फोटाने नष्ट झालेल्या भूज हवाई पट्टीची पुनर्बांधणी केली होती.
स्काय फोर्स : संदीप केवलानी दिग्दर्शित २०२५ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यात अक्षय कुमार आणि वीर पहारिया हे मुख्य भुमिकेत दिसतात. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचे पराक्रम, शौर्य आणि बलिदान आणि मर्यादित तंत्रज्ञानाच्या बळावर भारतीय हवाई दलाने युद्ध जिंकण्यात कशी महत्त्वाची भूमिका बजावली यावर आधारीत हा चित्रपट आहे.