द्वारपालक मूर्तीवरील ४.५४ किलो सोन्याचा हिशेब नाही; प्रायोजकाने 'टीडीबी'कडे मागितली होती परवानगी
कोची: सबरीमाला येथील अय्यप्पन मंदिरातून सोने चोरीला गेल्याचा आणि व्यवहारात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात केरळ उच्च न्यायालयाच्या निष्कर्षातून अनेक नवे आणि चिंताजनक खुलासे झाले आहेत. मंदिराचा प्रायोजक उन्नीकृष्णन पोट्टी याने ९ डिसेंबर २०१९ रोजी त्रावणकोर देवस्वोम बोर्डाला (TDB) पत्र लिहून, शिल्लक राहिलेल्या सोन्याचा वापर एका गरजू मुलीच्या लग्नासाठी करण्याची परवानगी मागितल्याचे उघड झाले आहे.
पोट्टी यांनी टीडीबीला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, सबरीमलाच्या गर्भगृहाचे मुख्य प्रवेशद्वार आणि द्वारपालक मूर्तींवर सोन्याचे काम पूर्ण झाल्यानंतर काही सोने शिल्लक राहिले आहे. या अतिरिक्त सोन्याचा वापर टीडीबीच्या समन्वयाने एका गरजू मुलीच्या लग्नासाठी करण्याची त्यांची इच्छा आहे आणि याबाबत त्यांनी बोर्डाचे 'मूल्यवान मत' मागितले होते.
वास्तविक, मंदिराच्या गर्भगृहाच्या बाहेर असलेल्या 'द्वारपालक' (द्वाराचे रक्षक) या दगडी मूर्तींवर सोन्याचा मुलामा असलेल्या तांब्याच्या पत्र्या लावलेल्या आहेत. याच पत्र्यांवरून सोने चोरी आणि गडबडीचे गंभीर आरोप झाले आहेत. विरोधकांचा आरोप आहे की, टीडीबीने या पत्री दुरुस्तीसाठी काढून प्रायोजक उन्नीकृष्णन पोट्टी यांच्या ताब्यात दिल्या होत्या.
या गंभीर प्रकरणाची दखल केरळ उच्च न्यायालयाने घेतली असून, सबरीमला अय्यप्पन मंदिरातील 'द्वारपालक' मूर्तींवरून गायब झालेल्या सोन्याचा शोध घेण्यासाठी दक्षता चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि सुमारे ४.५४ किलोग्रॅम सोन्याचा कोणताही पत्ता नसण्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे सोने २०१९ मध्ये जेव्हा या मूर्त्यांना पुन्हा सोन्याचा मुलामा (प्लेटिंग) देण्यात आला होता, तेव्हापासून गायब असल्याचे सांगितले जात आहे आणि या सोन्याची अंदाजित किंमत सुमारे ७ कोटी रुपये आहे.
वजनातील तफावतीने उघड झाले रहस्य
न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही. आणि के. व्ही. जयकुमार यांच्या खंडपीठाने नमूद केले की, द्वारपालक मूर्तींची शोभा वाढवणाऱ्या सोन्याचा मुलामा असलेल्या तांब्याच्या पत्र्या २०१९ मध्ये नवीन प्लेटिंगसाठी काढण्यात आल्या, तेव्हा त्यांचे वजन ४२.८ किलोग्रॅम होते. परंतु, जेव्हा हे काम करण्यासाठी चेन्नईतील एका फर्मकडे त्या सुपूर्द करण्यात आल्या, तेव्हा त्यांचे वजन कमी झाले आणि ते ३८.२५८ किलोग्रॅम भरले. या गहाळ सोन्याची किंमत जवळपास ७ कोटी इतकी आहे.
वजनातील ४.५४ किलोग्रॅमची ही मोठी घट 'चिंताजनक' असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. इतक्या महत्त्वपूर्ण वजनाच्या फरकाची माहिती मंदिर प्रशासन सांभाळणाऱ्या त्रावणकोर देवस्वोम बोर्डाने (टीडीबी) त्या वेळी का दिली नाही, असा प्रश्नही न्यायालयाने उपस्थित केला आहे. हिंदू मंदिर वास्तुकलेतील एक सामान्य वैशिष्ट्य असलेल्या 'द्वारपालक' मूर्तींशी संबंधित या चोरीच्या प्रकरणाची सखोल आणि व्यापक चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.