मुरबाड (वार्ताहर) : मेट्रो रेल्वेने दळणवळणाचा चेहरामोहरा बदलला आहे आणि या आधुनिक प्रवासाचे नेतृत्व आता एका असामान्य जिद्दीच्या तरुणीने केले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील 'आसोळे' या छोट्याशा गावातून आलेल्या प्रगती दीपक कोर हिने महिला मेट्रो पायलट बनण्याचा मान मिळवला आहे. शारीरिक आणि आर्थिक मर्यादा ओलांडून केवळ आपल्या मेहनतीच्या बळावर हे मोठे यश संपादन केल्याने, प्रगती संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
डिझाइन इंजिनीअर ते मेट्रो पायलट: स्वप्नपूर्तीची कहाणी प्रगतीचा शैक्षणिक प्रवास नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे. तिने आपल्या मूळगावी शालेय शिक्षण पूर्ण करून दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली. त्यानंतर, त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आणि पुढे खारघर येथील एस.सी. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून बी.ई. (इंजिनीअरिंग) पदवी प्राप्त केली. अभ्यासासोबतच प्रगतीने कामाचा अनुभवही घेतला. काही काळ 'इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये डिझाईन इंजिनीअर म्हणून काम केले. मात्र, तिचे स्वप्न मेट्रो पायलट बनण्याचे होते. या ध्येयपूर्तीसाठी तिने आवश्यक त्या सर्व परीक्षा दिल्या.
लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये यशस्वी होऊन ५ सप्टेंबर २०२२ रोजी प्रगती मुंबई मेट्रोमध्ये पायलट म्हणून निवडल गेली. प्रगती सांगते, "कोणतेही क्षेत्र केवळ पुरुषांसाठी नाही. तुम्ही मेहनत केल्यास यश तुमची वाट पाहत असते. या क्षेत्रात मला मिळालेल्या यशाचा मला खूप अभिमान आहे.'' आपल्या यशामागे आई-वडिलांचा आधार, सातत्यपूर्ण परिश्रम आणि स्वतःवरील अटळ विश्वास असल्याचे प्रगती आवर्जून सांगते.
"स्वतःवर विश्वास ठेवा. आपण कुठेही कमी नाही, हे लक्षात ठेवा. ध्येयाचा मार्ग सोपा नसेल तरी जिद्दीने चालत राहिल्यास आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होते," असा आत्मविश्वासपूर्ण संदेश ती अन्य तरुणवर्गाला देत आहे.