Friday, October 24, 2025
Happy Diwali

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

पथदर्शी धोरणानुसार मुंबई महापालिकेच्या शाळा १० मजली होणार

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने आपल्या शाळांच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळेची नवी इमारत विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असावी यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पथदर्शी धोरण आखले आहे. या धोरणानुसार शाळांच्या नव्या इमारती गगनचुंबी असणार आहेत. या इमारतींमध्ये विज्ञान, भूगोल, संगणक आदींसाठी प्रयोगशाळा, वाचनालय, मानसिकदृष्ट्या विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी वर्ग, बहुउद्देशीय सभागृह, कौशल्य विकास केंद्र आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.

मुंबई महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. पालिका नव्याने बांधत असलेल्या या इमारती सोयी-सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. या शाळांमध्ये प्रत्येक मजल्यावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

कुलाबा, जुहू येथील गांधी ग्राम, न्यू माहीम, साईबाबा पथ या चार शाळांच्या इमारतींचा त्यात समावेश असेल. यापैकी कुलाबा व जुहू येथील शाळांना अद्याप बहुमजली इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. या इमारती मुंबई महापालिकेच्या शाळा पायाभूत सुविधा कक्षातर्फे बांधण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या १५०० पेक्षा जास्त आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा