अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसअखेर २ बाद १२१ धावसंख्येवरून पुढे भारताने खेळण्यास सुरूवात केली आहे.
मैदानावर शुभमन गिल आणि केएल राहुल फलंदाजी करत आहेत. अहमदाबाद कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा भारताने ३८ षटकांत 2 विकेट्स गमावून १२१ धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा केएल राहुल ११४ चेंडूत ५३ धावांवर नाबाद होता. तर कर्णधार शुभमन गिल ४२ चेंडूत १८ धावांवर नाबाद होता. कसोटीचा पहिला दिवस भारताच्या गोलंदाजांनी गाजवला. त्यांनी विंडीजच्या क्रिकेटर्सना अर्धा दिवसही खेळू दिले नाही.जस्टिन ग्रीव्हजने ४८ चेंडूत ३२ धावा काढत विरोधी संघाकडून सर्वाधिक धावा काढल्या. मोहम्मद सिराजचा विकेटचा चौकार, जसप्रीत बुमराहच्या तीन विकेट तसेच कुलदीप यादवच्या २ विकेटच्या जोरावर भारताने विंडीजचा डाव १६२ धावांवर रोखला. वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेतली.
त्यानंतर भारताने खेळण्यास सुरूवात केली. भारताची सुरूवात आश्वासक वाटली. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने 68 धावांची दमदार सलामी भारतीय संघाला दिली. पण यशस्वी जयस्वाल चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करु शकला नाही. मात्र त्याचवेळेस सलामीवीर यशस्वी जायसवाल ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला साई सुदर्शनला केवळ ७ धावाच करता आल्या. आता कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या संघावर मोठी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल.