पुणे: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कारला पुण्यात भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ (नवले ब्रिज परिसरात) हा अपघात झाला असून, यामध्ये रिक्षाचालकासह तीन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. गौतमी पाटीलच्या भरधाव वेगातील कारने या उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या वेळी नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या गाडीमध्ये नव्हती, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी गौतमीच्या वाहन चालकाला तातडीने ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.
ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की, यामागे अन्य कोणते तांत्रिक कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला होता.