दुबई: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर दमदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भावूक घोषणा केली आहे. त्याने या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय लष्कराला देण्याचा निर्णय जाहीर केला.
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव सुरुवातीपासूनच दिसून येत होता. विशेषतः पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये अधिक तणाव निर्माण झाला. या हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले आणि निरपराध नागरिकांचाही बळी गेला. या पार्श्वभूमीवर, सूर्यकुमारने स्पर्धेतील पहिल्या सामन्यानंतरच हा विजय भारतीय सेनेला समर्पित केला होता. आता अंतिम सामन्यातील विजयानंतर त्याने आपली संपूर्ण मॅच फी दान करण्याचा निर्णय घेऊन आपले विचार कृतीत उतरवले आहेत.
या सामन्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यादरम्यान भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. याच पार्श्वभूमीवर सूर्यकुमारने हा निर्णय घेऊन देशासाठी लढणाऱ्या जवानांप्रती आणि दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबांप्रति आपली सहवेदना व्यक्त केली आहे. त्याच्या या निर्णयाने देशभरातून त्याचे कौतुक होत आहे.
सूर्यकुमारची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका संदेशात सूर्यकुमारने लिहिले, "मी या स्पर्धेतील माझी मॅच फी आपल्या भारतीय जवानांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पीडित झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही नेहमी माझ्या विचारात राहता." त्याच्या या ट्विटला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.