
मुंब्रा : जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला होता. काही प्रवासी रेल्वे रुळावर तसेच दोन रुळांमधील कुंपणावर पडले होते. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीच्या हाती नवी माहिती आली आहे. सीएसएमटी-कर्जत लोकलच्या नवव्या किंवा दहाव्या डब्याच्या पायदानावर उभ्या असलेल्या प्रवाशाकडे ३० सेमी जाडीची बॅग होती. ही बॅग समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डब्याच्या पायदानावर उभ्या प्रवाशांना लागली. त्यामुळे प्रवासी एकमेकांवर आदळले आणि काही लोकलमध्ये; तर काही रुळांवर पडले. कसारा-सीएसएमटी लोकलच्या काचांवर आलेले ओरखडेही या बॅगमुळे झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कर्जत लोकलमधील प्रवासी पायदानावर उभा असताना बॅग सावरण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारात त्याचा तोल गेला आणि तो समोरून येणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलवर आदळला. त्यामुळे त्याच डब्यातील आणखी काही प्रवासी खाली पडले. ताशी १५० किमी वेगाने लोकल धावत असताना दोन्ही गाड्यांमध्ये फक्त साधारण ०.७५ मीटर अंतर होते. यामुळे हे लहान वाटणारे कारण मोठ्या अपघाला कारणीभूत ठरू शकते असे निरीक्षण समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. हाती आलेल्या या नव्या माहितीमुळे एक जाडजूड बॅग ही रेल्वे प्रवाशांच्या अपघाती मृत्यूचे कारण ठरल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मध्य रेल्वेने पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अहवालानुसार जाडजूड बॅग अपघाताला कारणीभूत ठरली आहे. यामुळे पायदानावर प्रवास करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई, प्रलंबित ऐरोली-कळवा उन्नत रेल्वेमार्ग तातडीने पूर्ण करणे, नव्या मार्गिका उभारणे; ही कामं करण्याची शिफारस समितीकडून रेल्वे मंडळाला करण्यात आली आहे.