मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. आधीच पुराने त्रस्त असलेल्या मराठवाड्याला पुढील दोन दिवस आणखी धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. २८ आणि २९ सप्टेंबरदरम्यान राज्यभर जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून, धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो औरंगाबाद, अकोला, नाशिक या भागातून पुढील १२ तासांत पश्चिमेकडे सरकून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. त्यानंतर तो हळूहळू कमकुवत होण्याची शक्यता आहे.
मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढला, रस्ते, रेल्वे वाहतूक मंदावली
यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीय वाढले आहे. संभाजीनगरमध्ये सरासरी ५८१.७ मिलिमीटरच्या तुलनेत ७०८.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ११५ ते १५३ टक्क्यांपर्यंत जास्त पाऊस नोंदविला गेला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अक्कलकोट-वाघदरी मार्गावर पाण्याने पूल झाकल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील अनेक कुटुंबांना घरे सोडून सुरक्षितस्थळी जावे लागले आहे. उंदरगावातील दत्तात्रय कोळी यांच्यासह अनेकांचे संसार पुन्हा उघड्यावर आले आहेत.
नाशिकमध्ये देखील परिस्थिती गंभीर झाली आहे. शहरातील रस्ते नाल्यात रूपांतरित झाले असून, त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. गंगापूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे.
येवला तालुक्यात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी शिरले. शेतकऱ्यांचीही पिके पाण्यात बुडाल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. उंदीरवाडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, तर बल्हेगावात पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून ८०० पेक्षा जास्त कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.
राज्यभरात सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांचे हाल होत असून, पुढील दोन दिवस परिस्थिती अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, जनतेनेही सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जात आहे.