सहकार्य

कथा : प्रा. देवबा पाटील


आदित्यने आधीपासूनच सुभाषला काहीतरी मदत करण्याचा आपल्या मनाशी ठाम निश्चय केलेला होताच. एके दिवशी आदित्य सुभाषला म्हणाला, “तुझ्या गावात भाजीपाला पिकतो असे तू मागे सांगितले होते. भाजीपाला विकत घेण्यासाठी मी तुला दररोज १०० रु. एक महिन्यांपर्यंत असे देत जातो. माझ्या घरचा मोठा सच्छिद्र हारा व सायकलही तुला देतो. दररोज सकाळीच तू तुझ्या गावच्या शेतकऱ्याजवळून भाजीपाला विकत घ्यायचा. तो स्वच्छ पाण्याने धुवायचा. स्वच्छ कापडाने पुसून कोरडा करायचा. हा­ऱ्यामध्ये भाजीपाला नीट रचून ठेवायचा. बारीक छिद्रांतून हवा लागल्यामुळे भाजीपाला खराब होणार नाही. भाजीपाल्याचा हारा सायकलच्या कॅरिअरवर ठेवायचा व दोरीने नीट बांधून घ्यायचा. सायकलने येथे तो भाजीपाला आणायचा. येथील शेजा­ऱ्यांना तो भाजीपाला विकून त्यावर जो नफा राहील तो तू घ्यायचा. नंतर शाळेत जायचे. ठीक आहे?”
सुभाषने आनंदाने होकारार्थी मान डोलावली.
“आता पुढचे ऐक. तुला रोजचा जो नफा राहील तो तू बाजूला काढून ठेवायचा. जसजसे तुझे गि­ऱ्हाईक वाढत जातील तसतसा तुला तुझ्या ह्या बचतीचा पैसा कामात पडत जाईल. एक महिन्यानंतर तुला दररोजचे १०० रु. देणे थांबवू. अर्थात ही सायकल तुला कायमची दिली, ती आता तुझीच झाली असेच तू समज. हारासुद्धा तू कायमचा वापरायचा. तो खराब झाल्यानंतर पुढे तुझ्या कमाईतून नवीन चांगला हारा विकत घ्यायचा. असा पुढे तुला तुझा हा छोटासा व्यवसाय तुझ्या हिंमतीवर, कमाईवर व बचतीवर चालवावा व वाढवावाही लागेल व शिक्षणही करावे लागेल.”
‘हो.’ सुभाष म्हणाला.
“एवढेच नाही,” आदित्य पुढे म्हणाला, “तर अभ्याससुद्धा चांगला मनापासून करावा लागेल. परीक्षेत चांगले मार्क्सही मिळवावे लागतील.”
‘होय दादा.’ सुभाष बोलला.
सुभाष घरी गेला. रात्री त्याने आपला अभ्यास पूर्ण करून घेतला. दुसऱ्या दिवसापासून सुभाषची दररोजची दिनचर्या सुरू झाली. तो दुस­ऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला. पटकन आपली आंघोळ उरकली. कशीबशी आपली भाकरी टाकली नि तीवर चटणी टाकून ती एका फडक्यात बांधली. नंतर तो ताबडतोब त्याच्या गावच्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याच्या गाड्या जेथून शहरामध्ये भाजीपाला विकण्यासाठी जातात तेथे गेला. त्याने त्यांना सगळी हकिकत सांगितली. ते ऐकून प्रत्येकाने आपापल्या जवळील भाजीपाला त्याला अगदी रास्त भावात दिला. त्याने प्रत्येक शेतकऱ्याला ताबडतोब ज्याचे त्याचे पैसे दिलेत. घरी नेऊन त्याने भाजीपाला स्वच्छ पाण्याने धुतला. स्वच्छ कापडाने कोरडा केला. हा­ऱ्यात नीट रचून ठेवला. हारा सायकलच्या कॅरिअरवर दोरीने नीट पक्का बांधला. आपले दप्तर व भाकर घेतली नि सायकलवर टांग टाकली व अवंतीपूरकडे निघाला.
थोड्याच वेळात सुभाष आदित्यच्या घरी पोहोचला. आदित्य स्वत: त्याच्यासोबत बाहेर आला व त्याच्या सायकलसोबत चालू लागला. आदित्यने त्याची सा­ऱ्या शेजा­ऱ्यांशी ओळख करून दिली. त्याच्याजवळ कसा चांगला ताजा ताजा भाजीपाला असतो हेही त्या प्रत्येक शेजाऱ्या­ला सांगितले.
आदित्यने सांगितल्यामुळे सा­ऱ्या शेजाऱ्यांनी त्याचा भाजीपाला विकत घेतला. शाळा सुरू होण्याचा वेळ हाईपर्यंत त्याचा सारा भाजीपाला बरोबर विकून संपला. त्यामुळे तो सरळ सरळ शाळेत गेला. शाळेत गेल्यावर त्याने आपली सायकल कुलूप लावून सुरक्षित ठेवली.
आदित्य आता दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर एक तास नियमितपणे त्याचा अभ्यासही घेऊ लागला. सुभाष जसा अभ्यासात हुशार होता तसाच व्यवहारातसुद्धा होता. एका महिन्यातच त्याने आदित्यचे उसने घेतलेले पैसे फेडलेत व तो स्वावलंबी झाला. त्याची उन्नती पाहून आदित्यही खूश झाला.

Comments
Add Comment

मनाचा मोठेपणा

कथा : रमेश तांबे शाळेत भाषण स्पर्धेचे आयोजन केले होते. विद्याधरने नेहमीप्रमाणे आपले नाव स्पर्धेसाठी दिले होते.

प्रार्थना

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, अध्यात्मिक, कला-क्रीडा अशा संस्थांमध्ये

फुलासंगे मातीस वास लागे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणसाच्या आयुष्यात संगतीचे महत्त्व फार मोठे असते. एखाद्या व्यक्तीचा

फुलांचा राजा

कथा : रमेश तांबे फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इंद्रदेवाने फुलांची एक स्पर्धा भरवली होती. सर्व छोटी-मोठी फुले

सूर्याचे प्रकाशस्तंभ कसे असतात?

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्य, सुभाष व त्यांचे मित्रमंडळ रोजच्यासारखे शाळेच्या मधल्या सुट्टीत निंबाच्या

ये दिल मांगे मोर...

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एका मराठी लेखासाठी हे इंग्रजी आणि हिंदीमिश्रित नाव कशासाठी? हा तुम्हाला प्रश्न