मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार, ऑक्टोबरमध्ये चार रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार ही सामान्य बंदीच्या दिवशी येत आहेत. याशिवाय, विविध राज्यांमध्ये सण, उत्सव आणि विशेष कार्यक्रमांमुळे बँका १५ दिवस बंद राहतील. त्यामुळे जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेचे काही महत्त्वाचे काम असेल, तर या ठराविक सुट्ट्या टाळून तुम्ही बँकेला भेट देऊ शकता.
ऑक्टोबर महिन्यातील बँक सुट्ट्या आणि बंदीची माहिती खालीलप्रमाणे आहे. १ ऑक्टोबरला महानवमी निमित्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, असम, झारखंड, सिक्किम, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील बँका बंद राहतील. २ ऑक्टोबरला गांधी जयंती, विजयादशमी व दसऱ्याच्या निमित्ताने सर्व ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. सिक्किममध्ये ३ व ४ ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा साजरी होणार असल्याने बँका बंद राहतील. ५ व १२ ऑक्टोबरच्या रविवार आणि ११ व २५ ऑक्टोबरच्या दुसरा व चौथा शनिवारी बँका सर्वत्र बंद राहतील.
त्रिपुरा व पश्चिम बंगालमध्ये ६ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजा, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश व ओडिशामध्ये ७ ऑक्टोबरला महर्षि वाल्मिकी जयंती किंवा कुमार पौर्णिमा, हिमाचल प्रदेशमध्ये १० ऑक्टोबरला करवा चौथ साजरी होईल. आसाममध्ये १८ ऑक्टोबरला काटी बिहू, तर २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान बहुतांश ठिकाणी दीपावली, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, गोवर्धन पूजा, भाऊबीज व चित्रगुप्त जयंती यासारख्या सणामुळे बँका बंद राहतील.
बिहार, झारखंड व पश्चिम बंगालमध्ये २७ व २८ ऑक्टोबर रोजी छठ पूजा, तर गुजरातमध्ये ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त बँका बंद राहतील.
तरीही, बँक सुट्ट्या असूनही तुम्ही ऑनलाइन बँकिंग सेवांचा (UPI, IMPS, NEFT, RTGS) आणि ATM चा वापर करून पैसे हस्तांतरित करू शकता. या सुट्ट्यांमुळे ऑनलाईन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही.