भोXXXX सरकार कोणाचं आहे? हXXXX लोक आहेत, संजय राऊतांची जीभ घसरली
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सणसणीत उत्तर देत पलटवार केला. त्यामुळे बिथरलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातही शब्दयुद्ध पेटले आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवरून सरकारवर टीका करत कर्जमाफीची मागणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या वक्तव्याला परखड उत्तर दिलं. त्यानंतर शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत संतापले आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. संतापाच्या भरात त्यांनी उघडपणे शिव्यांचा भडिमार केला.
राज्यातील मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत, गावं आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत. अनेक शाळा बंद ठेवाव्या लागल्या, तर शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडाली. या गंभीर परिस्थितीत सरकार कुठे आहे, असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, “सरकारनं २४ तास काम केलं पाहिजे, पण त्यांचं लक्ष क्रिकेट सामन्यांच्या सुरक्षेवर आहे. शेतकऱ्यांचं रक्षण मात्र कुणालाही महत्त्वाचं वाटत नाही.” राऊत यांनी पालकमंत्र्यांवरही निशाणा साधला. पूरग्रस्त भागात ठाण मांडून बसण्याऐवजी ते मुंबईत राजकारणात गुंतले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
संतापाच्या भरात राऊत म्हणाले की, “सरकार कोणाचं आहे? सत्ता कोणाच्या हातात आहे? जनता शिव्या घालत आहे, त्यामुळे माझ्या तोंडातूनही शिव्या निघाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मराठवाड्याचा दौरा करावा, लोकांच्या आक्रोशाला उत्तर द्यावं.” त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ माजली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी धाराशिव दौऱ्यावर शेतकऱ्यांना धीर देत कर्जमाफीची मागणी केली होती. “सरकार योग्य वेळी कर्जमाफी करू म्हणतंय, म्हणजे निवडणुकीच्या वेळी करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पंतप्रधान केअर फंडातूनही शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर ठाकरेंना कोंडीत पकडलं. फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री असताना ठाकरे सरकारला पीएम केअर फंडासारखा स्वतंत्र फंड तयार करण्याची परवानगी मिळाली होती. त्या फंडात ६०० कोटी जमा झाले, पण तो पैसा शेतकरी किंवा रुग्णांवर खर्च केला गेला नाही. आज मात्र त्याच फंडाची मागणी ते करत आहेत.”
फडणवीसांनी ठाकरेंवर आणखी टीका करत सांगितलं की, “कोरोना काळात लोकांना बेड नव्हते, ऑक्सिजन नव्हता. लोक मरत होते. पण ठाकरे सरकारनं ६०० कोटींचा फंड वापरला नाही. आज ते कोणाला काय शिकवतात?” या एका वाक्यात त्यांनी ठाकरे यांना राजकीय अडचणीत आणलं.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेवरून सुरू झालेली चर्चा आता राजकीय शब्दयुद्धात बदलली आहे. ठाकरे यांनी कर्जमाफीवरून सरकारला घेरलं, तर फडणवीसांनी ६०० कोटींच्या फंडाचा मुद्दा उचलून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं. त्यातच राऊतांच्या गटारातून शिव्या निघाल्याने वातावरण आणखी तापलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी प्रश्नांवरून पुन्हा एकदा चांगलीच ठिणगी पडली असून, पुढील काही दिवस शब्दबाणांची लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, तुम्ही शेतकऱ्यांना काय मदत केली, हे मला दाखवा. आम्हाला काय विचारत आहात, तुम्ही काय केलं म्हणून. सरकार तुमचं आहे. भोXXXX सरकार कोणाचं आहे? आमचा आहे का? तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारत आहात? हXXXX लोक आहेत. आम्हाला प्रश्न विचारत आहात. सत्ता कोणाची? तिजोरी कोणाच्या हातात? जनता शिव्या घालत आहे म्हणून माझ्या देखील तोंडातून शिव्या आल्या. निर्लज्जपणाचा कळस आहे. उद्या अमित शहा येणार आहेत. नरेंद्र मोदी येणार आहेत. आता हे त्यांच्या मागे धावत जाणार आहेत, अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी इकडे यावं आणि सगळी यंत्रणा विस्कळीत करावी हे पंतप्रधानांना कळत नाही का?