जयपूर : राजस्थानच्या कोटा येथे एका फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत अभिनेत्री रीता शर्माच्या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये "वीर हनुमान" मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणारा बाल कलाकार वीर शर्माचा समावेश आहे.तसेच या दुर्घटनेत वीरचा भाऊ शौर्य शर्माचाही मृत्यू झाला. वीर १० वर्षांचा आणि त्याचा भाऊ १५ वर्षांचा होता.
घरामध्ये आग लागली त्यावेळी मुलांचे पालक घरी नव्हते. वीरचे वडील जितेंद्र शर्मा संध्याकाळी भजनासाठी गेले होते, तर त्यांची आई रीता शर्मा काही कामानिमित्त मुंबईत गेली होती. रीता शर्मा या अभिनेत्री आहेत. अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांनी या दुर्घटनेत जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनंतपुरा पोलीस स्टेशन परिसरातील दीपश्री इमारतीत ही घटना घडली. दोन्ही मुलं शनिवारी घरात झोपली होती. स्टेशन हाऊस ऑफिसर भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं की, इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ४०३ मध्ये आग लागली. शेजाऱ्यांना फ्लॅटमधून धूर येताना दिसला, त्यानंतर दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढण्यात आलं. दोन्ही मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळली आणि त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
१० वर्षांचा वीर हा बाल कलाकार होता, तर त्याचा भाऊ शौर्य आयआयटीची तयारी करत होता. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय आहे. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.