ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या 'आधारवड' मोबाइल अॅपला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. कोपरी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून परिसरातील ज्येष्ठांना या अॅपची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन करत आहेत. या मोहिमेमुळे ज्येष्ठांच्या मनात विश्वास, सुरक्षिततेची जाणीव आणि पोलीस प्रशासनाशी जोडलेपण अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसले. कोपरी पोलीस परिसरातील ज्येष्ठांना प्रत्यक्ष भेटीगाठी करून अॅपचे महत्त्व पटवून देत मोबाइलवर हे अॅप डाउनलोड करून देण्यात येत आहेत, तसेच त्याचा वापर कसा करावा हेही दाखवून दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अॅप एकप्रकारे जीवनरक्षक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केली.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतील 'आधारवड' मोबाइल अॅप जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोपरी पोलीस ठाण्याच्या या मोहिमेत पोलीस अधिकारी व कर्मचारी स्वतः ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत होते. अनेक ज्येष्ठांनी आपल्या मनातील भीती व समस्या व्यक्त केल्या. पोलिसांनी त्या मनापासून ऐकून घेतल्या आणि तत्काळ मार्गदर्शन केले. त्यामुळे “आधारवड” हा शब्द केवळ मोबाइल अॅपपुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने पोलिसांचा आधारवड ठरतो आहे, अशी भावना नागरिकांमध्ये उमटली. या वेळी पो. उपनिरीक्षक नितीन राऊत, सिताराम गावित, पोलिस हवालदार जितेंद्र खलाटे, दीपक पाटील, करण जवाने आदी विशेष परिश्रम घेत आहेत.
'आधारवड' मोबाइल अॅप माध्यमातून पोलिसांनी केवळ सुरक्षेची हमी दिली नाही, तर “तुम्ही एकटे नाही, पोलीस कायम तुमच्या पाठीशी आहेत” असा आश्वासक संदेशही दिला. त्यामुळे एक समाधान, दिलासा आणि विश्वास वाटला. - वामन कर्वे,ज्येष्ठ नागरिक, ठाणे पूर्व
अॅपची वैशिष्ट्ये :
- एका क्लिकवर थेट पोलिसांशी संपर्क साधण्याची सुविधा.
- आपत्कालीन परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना झटपट मदत मिळण्याची खात्री.
- कुटुंबीयांचे व नातेवाइकांचे तातडीचे संपर्क क्रमांक अॅपमध्ये सेव्ह करण्याची सोय.
- वैद्यकीय माहिती
- ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसोबत मानसिक आधार व आत्मविश्वास वृद्धिंगत होणे.