डीपीडीसी बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
ठाणे : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत स्टेमचे (ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या) व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची तत्काळ उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी नव्या आणि पात्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ही बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार बालाजी किणीकर, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, संजय केळकर, राजेश मोरे, सुरेश म्हात्रे, किसन कथोरे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. प्रमुख अधिकाऱ्यांमध्ये जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल, जिल्हा परिषदेचे सीईओ रोहन घुगे, ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचीही उपस्थिती होती. तथापि, या महत्त्वपूर्ण बैठकीस मंत्री गणेश नाईक आणि आमदार जितेंद्र आव्हाड अनुपस्थित होते.
बैठकीदरम्यान स्टेम या पाणीपुरवठा करणाऱ्या सरकारी संस्थेतील संकेत घरत यांची नियुक्ती ही अनधिकृत आणि नियमबाह्य असल्याचा गंभीर आरोप काही लोकप्रतिनिधींनी केला. आमदार संजय केळकर यांनी अधिकृत आणि अनधिकृत इमारतींबाबत प्रश्न उपस्थित करत, स्टेममध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचे मुद्दे चर्चेस आणले. रईस शेख यांनीही भिवंडी महानगरपालिकेला स्टेमकडून पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, यामागे भ्रष्ट कारभार असल्याचा आरोप केला.
या आरोपांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकेत घरत यांची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच ‘संकेत घरत यांचा तत्काळ चार्ज काढून टाका’ असे स्पष्ट आदेश देत, योग्य अधिकाऱ्याची निवड का झाली नाही, याचाही तपास करण्याचे निर्देश दिले.