नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव!

केंद्राला प्रस्ताव पाठविल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हे येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-३ या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, तसा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे, अशी माहिती शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना येथे दिली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी निवेदनही त्यांना सादर केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले. याशिवाय, महाराष्ट्रातील संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील पोलाद उत्पादनासाठी सवलती, दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या जागेचे हस्तांतरण तसेच ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’च्या दृष्टीने महाराष्ट्र शासन करीत असलेले उपाय इत्यादींबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय सविस्तर चर्चा केली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्तांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले असताना त्यांनी नवी मुंबई विमानतळाबाबत दिलेल्या माहितीमुळे नवी मुंबई, ठाणे ग्रामीण भाग, पनवेल, उरणसह रायगड जिल्ह्यांमध्ये दिवाळीसम उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विमानतळाला नवी मुंबई विमानतळ नाव संबोधले जात असले तरी हे विमानतळ प्रत्यक्षात रायगडच्या भूमीवर उभारण्यात आले आहे. येथील प्रकल्पग्रस्तांच्या विकासासाठी विशेषत: त्यांच्या पुनर्वसनासाठी साडेबारा टक्के योजना आणण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे लढवय्ये नेते दि. बा. पाटील यांनी प्रशासनदरबारी संघर्ष केला होता. लढा उभारला होता. दि. बा. पाटील यांच्यामुळे नवी मुंबई, ठाणे, पनवेल, उरणसह रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी लागल्याने रायगडच्या भूमीवर साकारल्या जात असलेल्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी निदर्शने व आंदोलनेही झाली आहेत.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीमुळे विमानतळ उद्घाटनासोबत दि. बा. पाटील यांच्या नावाचाही निर्णय होण्याचा आशावाद ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामस्थांकडून, प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात तपशीलवार सादरीकरण


संरक्षण आणि अंतरिक्ष क्षेत्रात महाराष्ट्र भक्कम भागीदार म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रात १० ऑर्डिनन्स फॅक्टरी आहेत. देशाला लागणाऱ्या एकूण शस्त्र आणि दारूगोळ्यापैकी ३० टक्के उत्पादन हे महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्र हे संरक्षण कॉरिडॉरसाठी प्रभावी क्षेत्र आहे. महाराष्ट्रात तीन संरक्षण कॉरिडॉरसंदर्भात तपशीलवार सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना दिले. यातील पहिला कॉरिडॉर पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, दुसरा कॉरिडॉर अमरावती, वर्धा, नागपूर, सावनेर आणि तिसरा कॉरिडॉर नाशिक-धुळे असा असेल. या तिन्ही कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक राज्यात येणार असून, त्यामुळे मोठा रोजगारसुद्धा निर्माण होईल. राज्य शासनाने यासंदर्भात ६०,००० कोटींचे सामंजस्य करार यापूर्वीच केले आहेत. त्यामुळे या कॉरिडॉरला मान्यता देण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली.



चीनपेक्षाही कमी किंमतीत स्टील उपलब्ध होणार आहे.


गडचिरोली येथे पोलाद सिटीत गुंतवणूक येत असून, हा एक आकांक्षित जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्य मायनिंग कॉर्पोरेशनला एरिया लिमिटमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी यांच्याकडे केली. गडचिरोलीत पोलाद उत्पादनाची प्रचंड क्षमता असून, हे स्टील, ग्रीन स्टील असणार आहे. चीनपेक्षाही कमी किंमतीत हे स्टील उपलब्ध होणार आहे.



दहिसर येथील जागेचे हस्तांतरण


दहिसर पूर्व येथील ५८ एकर जागेची मालकी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. या जागेचे मेट्रो कारशेडसाठी एमएमआरडीएला हस्तांतरण करण्याचा आधी निर्णय झाला होता. पण, डिझाईनमध्ये झालेल्या बदलांमुळे एमएमआरडीएने माघार घेतली. या जागेची मागणी आता मुंबई महापालिकेने केली आहे. या भागात एचएफ रिसिव्हिंग स्टेशन असल्याने या भागाचा संपूर्ण विकास खोळंबला आहे. हे हस्तांतरण झाल्यास या जागेचा सार्वजनिक उपयोगासाठी आणि विकासासाठी करता येईल. यामुळे उंचीचे प्रश्न सुद्धा सुटतील. त्यामुळे ही जागा मुंबई महापालिकेला देण्यात यावी, अशी मागणी या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

Comments
Add Comment

दीपोत्सव महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो : उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : दीपोत्सव राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि नवी ऊर्जा घेऊन येवो, अशा शुभेच्छा

मान्सूनची मस्ती: देवांची मुंबईत गडगडाटासह दिवाळी! मुंबई, ठाण्यात दिवाळीत मिम्सचा पाऊस

मुंबई: मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात अचानक आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने दिवाळीतील फटाक्यांच्या

कल्याणमध्ये धुंवाधार पाऊस, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, दिवाळीच्या उत्साहावर पाणी, वीज गायब!

ठाणे: ऐन दिवाळीच्या धामधुमीत, मंगळवारी (२१ ऑक्टोबर २०२५) कल्याण शहरात हवामानाने अचानक रूप बदलले आणि जोरदार

लक्ष्मीपूजनाच्या उत्साहावर पावसाचे पाणी; विजांच्या कडकडाटासह अनेक जिल्ह्यांमध्ये 'अवकाळी'

मुंबई: दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईसह महाराष्ट्रभरात

Stock Market Muhurat closing: मुहुरत ट्रेडिंगला तेजीचीच साथ मात्र गुंतवणूकदारांच्या सावधगिरीने बँक निफ्टी घसरला ! सेन्सेक्स ६२.९७ व निफ्टी २५.४५ अंकाने उसळला !

मोहित सोमण:आदल्या दिवशीची शेअर बाजारातील रॅली मुहुरत ट्रेडिंग (समावत २०८२) दरम्यान अबाधित ठेवली आहे. अर्थात शेअर

बीसीसीआयचा एसीसीवर दबाव, आशिया कप ट्रॉफी प्रकरणावरून कारवाईचा इशारा

नवी दिल्ली : आशिया कप २०२५ नंतर विजेत्या भारतीय संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही. ही ट्रॉफी मिळाली नाही तर