नवी दिल्ली : देशात ठिकठिकाणी रामलीला कार्यक्रम सोमवार २२ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून सुरू होत आहे. पण हा रामलीला कार्यक्रम सुरू होण्याआधीच दिल्लीत वेगळं महाभारत भडकलं आहे. याला निमित्त आहे हॉट बेब अशी ओळख मिरवणारी पूनम पांडे. पूनम पांडे दिल्लीच्या रामलीला कार्यक्रमात मंदोदरी ही भूमिका साकारणार आहे. पण पूनमला संधी देण्यावरुन रामलीला समितीमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. काही सदस्यांनी पूनममुळे गर्दी होईल या विचारातून निर्णयाला पाठिंबा दिला आहे तर काही सदस्य निर्णयाला विरोध करत आहेत.
मंदोदरी ही राक्षस राजा रावणाची पत्नी होती. रामायण काळातील सर्वात सुंदर स्त्री असे मंदोदरीचे वर्णन रामायणात आढळते. या तत्कालीन सुंदर महिलेची भूमिका साकारण्यासाठी पूनम पांडे तयारी करत आहे. पण पूनमला रामलीला कार्यक्रमात सहभागी करण्यावरुन वाद भडकला आहे. लव कुश समितीच्या अध्यक्षांनी पूनम पांडे मंदोदरी ही भूमिका साकारणार असे सांगितले. पण रामलीला समितीमध्ये पूनमवरुन सुरू झालेले मतभेद कार्यक्रमाला ४८ तासांपेक्षा कमी कालावधी उरला तरी संपलेले नाहीत.
पूनम पांडेची सोशल मीडियातील प्रतिमा ही रामलीला या कार्यक्रमाशी जुळणारी नाही. यामुळे पूनमला मंदोदरीची भूमिका देऊ नये, असे काही जणांचे मत आहे. त्यांनी मत ठामपणे मांडून पूनमला रामलीला कार्यक्रमात घेण्यास विरोध दर्शविला आहे. आता रामलीला समिती, विश्व हिंदू परिषद आणि समाजातील निवडक मान्यवर यांच्यातील चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.