शिर्डीतील प्रसादालयात मिळणार साई आमटीचा प्रसाद
नाशिक (वृत्तसंस्था) : शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात मराठमोळ्या ‘साई आमटी’चा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य आणि घरगुती चवीचा अनोखा संगम असणाऱ्या साई आमटीच्या प्रसादातून भक्तांना पोषण, सात्त्विकता मिळणार आहे. दर गुरुवारी ही साई आमटी चपाती किंवा गरमागरम भातासोबत प्रसादरूपात भक्तांना दिली जाणार आहे. साईबाबा संस्थानच्या भोजनगृहात दररोज हजारो भाविक प्रसादाचा लाभ घेतात. रोजच्या प्रसादापेक्षा साईभक्तांना आता नवीन साई आमटीची चव घेता येणार आहे. पौष्टिकता आणि सात्त्विकता हीच तिची खासियत ठरणार आहे.
श्री साईबाबांच्या ‘सात्त्विक अन्नातून सेवा’ या परंपरेला अनुसरून संस्थांकडून ही आमटी तयार केली जाणार आहे. प्रसादालयाचे प्रमुख संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साकारला आहे. राष्ट्रपती भवनातील आचाऱ्यांना महाराष्ट्रीय पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणारे आचारी रवींद्र वहाडणे आणि प्रल्हाद कर्डिले महाराज यांनी ही साई आमटी रेसिपी तयार केली आहे.आहारतज्ज्ञांच्या मते ही आमटी म्हणजे प्रथिनांचे भांडार आहे. साईभक्तांना या आमटीच्या रूपाने घरच्या जेवणाचा आनंद मिळेल.