आणि रंगमंचावर अवतरल्या ‘त्या तिघी’
राज चिंचणकर
यंदा पावसाने मुंबईत बराच धुमाकूळ घातला आणि त्याचा परिणाम नाटकांच्या प्रयोगांवरही झाला. १९ ऑगस्ट रोजी दादरच्या श्री शिवाजी मंदिरमध्ये ‘त्या तिघी - स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात वीरांगना’, या सावरकर घराण्यातल्या वीरांगनांची शौर्यगाथा सांगणाऱ्या नाटकाचा लावलेला प्रयोग वादळी पावसात वाहून गेला होता. साहजिकच, या प्रयोगासाठी पुण्याहून आलेल्या संबंधित नाटकमंडळींचा मोठा विरस झाला होता. या नाटकाचा नियोजित प्रयोग, तिसऱ्या घंटेच्या अवघ्या एक तास आधी रद्द करण्याची वेळ या मंडळींवर आली होती. पण त्यावेळी, श्री शिवाजी मंदिरमधून काढता पाय घेता घेता या नाटकाची निर्माती व अभिनेत्री अपर्णा चोथे हिने, पुन्हा नव्या उत्साहात नाट्यपंढरी श्री शिवाजी मंदिरात तिच्या नाटकाचा प्रयोग सादर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. तिची ही इच्छा या आठवड्यात, १६ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली आणि श्री शिवाजी मंदिरच्या रंगमंचावर ‘त्या तिघी’ मोठ्या उत्साहाने अवतरल्या.
ऑगस्ट महिन्यात या नाटकाचा प्रयोग रद्द झाला; त्यावेळी अपर्णा चोथे हिने ‘राजरंग’ कॉलमसाठी संवाद साधताना आश्वासकपणे सांगितले होते की, “श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात आमच्या नाटकाचा हा पहिलाच प्रयोग होता आणि या निमित्ताने एक चांगली आठवण कायमस्वरूपी जपली जाणार होती. मात्र जरी हे आत्ता घडले नाही; तरी पुढेमागे नक्कीच घडेल”. आता तिने तिचे हे म्हणणे खरे करून दाखवले आहे. या आठवड्यातला प्रयोग यशस्वीरीत्या पूर्णत्वास गेल्यावर अपर्णा चोथे म्हणाली, “नाटकातल्या त्या तिघी म्हणजेच येसूवहिनी, माई आणि ताई यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात यापेक्षा मोठी वादळे आली. पण त्यावर मात करत या तिघीजणी धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि त्यांनी त्यांचा सामना केला. वास्तविक, आताच्या आमच्या प्रयोगाच्या वेळीही पावसाने पाठ सोडली नव्हती. पण प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमचा श्री शिवाजी मंदिरातला स्वप्नपूर्ती प्रयोग सादर झाला”.