मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल करण्यात आलेली स्थगिती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सुभाष कपूर दिग्दर्शित हा कोर्टरूम ड्रामा १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'असोसिएशन फॉर एडिंग जस्टिस' या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, चित्रपटामध्ये वकिलांबरोबरच न्यायाधीशांचीही थट्टा केली आहे. विशेषतः "भाई वकील है" या गाण्याला विरोध करत, कायदेशीर व्यवसायाची प्रतिमा मलीन केल्याचा दावा करण्यात आला.
सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील दीपेश सिरोया यांनी असा मुद्दा उपस्थित केला की एका दृश्यात न्यायाधीशांना "मामू" असे संबोधले गेले आहे, जे त्यांच्या मते अपमानास्पद आहे. मात्र, मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठाने हा मुद्दा गांभीर्याने घेतला नाही. "आम्ही सुरुवातीपासूनच विनोद सहन करत आलो आहोत. आमचं काही बिघडत नाही," असे म्हणत त्यांनी याचिका फेटाळली.
या आधीही अलाहाबाद उच्च न्यायालयात अशाच प्रकारची एक याचिका दाखल झाली होती, जी तेथेही फेटाळण्यात आली आहे, अशी माहिती कोर्टासमोर मांडण्यात आली.
दरम्यान, इतर राज्यांमध्येही या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका वकिलाला निर्मात्यांना पक्ष न बनवताच याचिका दाखल केल्याबद्दल सुनावले आहे, तर गुजरात उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला आधी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे.
या सर्व घडामोडी असूनही, 'जॉली एलएलबी ३' नियोजित तारखेनुसार म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.