धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा केली. त्याचबरोबर विविध विकासकामांचे उद्घाटन केले. हे अभियान राबविण्यामागचा मुख्य हेतू महिलांना विविध योजनांचा लाभ मिळावा हे आहे.
मध्य प्रदेशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, विकसित भारताचे चार स्तंभ आहेत, ते म्हणजे महिला, युवा, गरीब आणि शेतकरी. भारताच्या विकासाचा पाया 'नारी शक्ती' आहे. यासाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान हे सुरू केले आहे. घरातली आई हा घराचा मुख्य कणा आहे. जर ती स्वस्थ व निरोगी असेल तर संपूर्ण घर सशक्त व कणखर बनते. घरातील स्त्री निरोगी आणि सशक्त व्हावी यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांना प्रथम प्राधान्य दिले आहे. याचबरोबर राज्यातील ८ वे राष्ट्रीय पोषण महा अभियान सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आदी सेवा पर्वाच्या पायाभरणीमुळे कापड उद्योग त्याचबरोबर राज्यातील युवांना नोकरीची संधी उपलब्ध होईल, असेही पंतप्रधान भाषणात संबोधित करताना म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपाकडून आठवडा सेवा पखवाडाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवविले जाणार आहेत.