छत्रपती संभजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजिलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना काही जणांनी गोंधळ घातला. गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य शासनाने जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाबाबत एक जीआर काढला. या जीआरला विरोध म्हणून आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. गोंधळ घालणारे ओबीसी समाजाशी संबंधित होते, असे वृत्त आहे. पोलीस या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करत असल्याचे प्रशासनाने सांगितले. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच या कार्यक्रमात उपस्थित असलेले काही जण उठले आणि घोषणा देऊ लागले. सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचं सांगत या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभास्थळी गोंधळ उडाला होता. पोलिसांनी तातडीने कारवाई केली. घोषणा देत असलेल्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून गोंधळ सुरू असताना ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या मंत्रालयातील दालनात पार पडली. या बैठकीला पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, इतर मागास व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, वनमंत्री गणेश नाईक आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. या वेळी अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.चर्चेअंती कागदपत्रांची सखोल छाननी करा, खाडाखोड किंवा संशयास्पद नोंदी दिसल्यास कसून तपासा, खात्री झाल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र देऊ नका असे निर्देश राज्य शासनाचे कॅबिनेट मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ओबीसी समाजासाठी प्रलंबित असलेला २,९३३ कोटी रुपयांचा निधी १५ दिवसांत वितरित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.