नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे ६९ रुग्ण आढळले आहेत. यापैकी १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी चिंता पसरली आहे. हा संसर्ग इतका घातक आहे की, त्याची लक्षणे सामान्य वाटत असली तरी तो जलद गतीने जीवघेणा ठरतो.
ब्रेन-इटिंग अमीबा म्हणजे काय?
'ब्रेन-इटिंग अमीबा' चे वैज्ञानिक नाव 'नैग्लेरिया फाउलरि' (Naegleria fowleri) आहे. हा सूक्ष्मजीव सहसा गरम आणि स्वच्छ पाण्यात, जसे की तलाव, नद्या किंवा गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये आढळतो. हा अमीबा नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि मेंदूत पोहोचल्यानंतर प्रायमरी एमीबिक मेनिनजोएन्सेफलाइटिस (PAM) नावाचा गंभीर संसर्ग पसरवतो. यामुळे मेंदूच्या पेशींना गंभीर नुकसान पोहोचते, म्हणूनच याला 'ब्रेन-इटिंग' अमीबा असे म्हटले जाते.
ही लक्षणे दिसल्यास लगेच सावध व्हा!
या संसर्गाची लक्षणे सुरुवातीला सामान्य तापासारखी वाटतात, त्यामुळे ती ओळखणे कठीण होते. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर १ ते ९ दिवसांत ही लक्षणे दिसू लागतात आणि ती खूप वेगाने वाढतात.
सुरुवातीची लक्षणे (पहिले ५ दिवस):
- अतिशय तीव्र डोकेदुखी
- उच्च ताप
- मळमळ आणि उलट्या
- मानेत कडकपणा
- अशक्तपणा
गंभीर लक्षणे (५ दिवसांनंतर):
- झटके येणे (दौरे)
- भ्रम आणि गोंधळ
- एकाग्रता साधण्यात अडचण
- शरीराचा तोल जाणे
- रुग्ण कोमामध्ये जाण्याची शक्यता
हा संसर्ग इतका घातक आहे की, लक्षणे दिसल्यानंतर १ ते १८ दिवसांच्या आतच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे, जर तुम्ही नुकतेच पाण्यात पोहला असाल आणि ही लक्षणे दिसल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ब्रेन-इटिंग अमीबापासून बचाव कसा कराल?
या संसर्गावर प्रभावी उपचार उपलब्ध नसल्यामुळे, बचाव हाच एकमेव उपाय आहे.
- नाक बंद ठेवून पोहा: गरम, गोड्या पाण्यात पोहताना नाकाचे क्लिप (nose clip) वापरणे महत्त्वाचे आहे. यामुळे पाणी नाकात जाणार नाही.
- पाण्यात डुबकी मारणे टाळा: अशा ठिकाणी पाण्यात डुबकी मारणे किंवा डोके पूर्णपणे बुडवणे टाळावे.
- उकळलेले पाणी वापरा: नाक स्वच्छ करण्यासाठी किंवा धुण्यासाठी फक्त उकळलेले, फिल्टर केलेले किंवा निर्जंतुक केलेले पाणी वापरावे.
- स्विमिंग पूलची स्वच्छता: खाजगी स्विमिंग पूलचे पाणी नियमितपणे क्लोरिनेटेड आणि स्वच्छ असल्याची खात्री करा.
जागरूक राहा: उथळ, स्थिर आणि गरम पाण्याच्या स्रोतांमध्ये पोहणे टाळा.
Source: