नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी
वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ते रशियावर कठोर निर्बध लादण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी नाटोला रशियावरील चीनची आर्थिक पकड कमजोर करण्यासाठी त्यावर ५०-१०० टक्के टॅरिफ कर लादण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते असे केल्याने युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल, असे ट्रम्प म्हणाले आहेत.
ट्रम्प यांनी नाटो देशांना शनिवारी एक पत्र जारी केले आहे, ज्यामध्ये त्यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे आणि रशियावर कठोर निर्बंध लादावेत, अशी मागणी केली. ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, जेव्हा सर्व नाटो देश रशियावर कठोर निर्बंध लावण्यास तयार असतील आणि जेव्हा ते हे करण्यास सुरुवात करतील आणि जेव्हा सर्व नाटो देश रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करतील तेव्हा मी रशियावर कठोर निर्बंध लादण्यासाठी तयार आहे.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअरच्या मते, नाटोचा सदस्य असलेल्या देश तुर्कीये हा चीन आणि भारतानंतर रशियन तेल खरेदी करणारा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. रशियन तेल खरेदी करण्यात सहभागी असलेल्या ३२-राज्यांच्या आघाडीवर असलेल्या सदस्यांमध्ये हंगेरी आणि स्लोवाकिया यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर आणखी निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर देखील निर्बंध लादणार असल्याचे सांगितले होते. या देशांमध्ये चीन व भारताचा समावेश होता. ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे जागतिक पातळीवर अशांतता वाढीस लागणार आहे.