मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता यूएसजीएसने ७.४ असल्याचे म्हंटले जात आहे. तर जर्मन भूविज्ञान संशोधन केंद्राच्या मते, भूकंपाची तीव्रता ७.१ मोजण्यात आली आणि त्याचे केंद्र समुद्राच्या पृष्ठभागाखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता ७.४ आणि त्याची खोली ३९.५ किलोमीटर होती. डेटामध्ये थोडेफार फरक असले तरी, दोन्ही एजन्सींनी तो खोल आणि शक्तिशाली भूकंप मानला आहे. भूकंपानंतर, पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने संभाव्य त्सुनामीचा इशारा जारी केला आणि इशारा दिला की हा प्रदेश धोक्यात येऊ शकतो.
त्याच वेळी, चीनच्या त्सुनामी वॉर्निंग सेंटरने देखील सकाळी १०:३७ वाजता (बीजिंग वेळेनुसार) कळवले की कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व समुद्री भागात भूकंप झाला. चीनच्या मते, भूकंपाची तीव्रता ७.१ होती आणि खोली १५ किलोमीटर होती. स्थानिक पातळीवर त्सुनामीचा धोका आहे.