स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा
शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह दर्शन व्यवस्थापन अधिक सुकर करण्यासाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘पीपल काउंटिंग प्रणाली’ कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रिस्मा एआय या कंपनीच्या देणगीतून उपलब्ध झालेल्या या यंत्रणेचा शुभारंभ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि प्रिस्मा एआयचे अध्यक्ष डॉ. श्रीराम अय्यर यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, सिसिटीव्ही विभाग प्रमुख राहुल गलांडे यांच्यासह प्रिस्मा एआयचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी उपस्थित होते.
साईबाबा मंदिर व परिसरातील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी, तसेच दर्शन व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पीपल काउंटिंग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
मंदिरात ‘पीपल काउंटिंग प्रणाली’ सुरू
सध्या ही एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणाली साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक १,६,७ व्हीआयपी गेट, सिटीझन गेट, गावकरी गेट, दिव्यांग गेट, मुखदर्शन गेट आणि नवीन दर्शन रांग येथे कार्यान्वित करण्यात आली आहे. पुढील काळात पालखी रोडसह पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील कॅमेरेही या यंत्रणेशी जोडले जाणार आहेत. उत्सवकाळात शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होते. अशावेळी भाविकांच्या वस्तू हरवल्यास किंवा एखाद्या भाविकाला चक्कर येऊन पडल्यास ही प्रणाली संस्थानाला तत्काळ अलर्ट देईल. त्यामुळे भाविकांच्या अडचणींवर लगेच उपाययोजना होणार आहे.
मंदिरातील भाविकांची अचूक नोंद होणार
एआय आधारित पीपल काउंटिंग प्रणालीमुळे साई मंदिर परिसरातील प्रमुख प्रवेशद्वारांवरून येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होणार आहे. तसंच दर्शनानंतर मुखदर्शन आऊट आणि बुंदी प्रसाद आऊट येथेही भाविकांच्या बाहेर जाण्याचे मोजमाप होणार आहे. त्यामुळे दररोजच्या भाविकसंख्येची शास्त्रशुद्ध आकडेवारी संस्थानाकडे उपलब्ध राहणार आहे.