मुंबई : दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणाऱ्या एल्फिन्स्टन ब्रिज अर्थात प्रभादेवी पुलावरील वाहतूक आज म्हणजेच शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री बारा वाजल्यापासून पूर्ण बंद होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण हा पूल पाडणार आहे. या ठिकाणी नंतर मुंबई महानगर विकास प्राधिकरण नवा एल्फिन्स्टन उड्डाणपूल तसेच शिवडी–वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपूल उभारणार आहे. हे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलीस विभागाने एल्फिन्स्टन ब्रिज बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी वापरायच्या पर्यायी मार्गाबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केली आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी वापरायच्या पर्यायी मार्गाबाबतची माहिती
दादर पूर्व ते पश्चिम – टिळक पूल
परळ पूर्व ते प्रभादेवी – करीरोड पूल
परळ/भायखळा पूर्व ते प्रभादेवी – चिंचपोकळी पूल
स्थानिकांसाठी सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
म्हाडाकडून एल्फिन्स्टन पूल बाधितांना घरे देण्यात येणार आहेत. दोन इमारतीतील ८३ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. प्रभादेवी येथील म्हाडा इमारतींमध्ये प्रत्येकी 405 चौरस फूट घरं प्रकल्पग्रस्त कुटुंबांना दिली जातील.
