मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या सिनेमांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. २००९ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट चांगलाच गाजला. आजही या चित्रपटाचा तेवढाच बोलबाला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.
येत्या दिवाळीत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता, मात्र आता या सिनेमा येत्या दिवाळीत प्रदर्शित न होता काही महिने लांबणीवर गेला असून पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या सिनेमाच्या लांबणीचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या सिनेमामध्ये अभिनेता सिद्धार्थ बोडके, सयाजी शिंदे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, विक्रम गायकवाड, मंगेश देसाई, शशांक शेंडे, संदीप जुवाटकर आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे, तर संगीत व पार्श्वसंगीताची जबाबदारी हितेश मोडककडे आहे. दरम्यान, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ नंतर प्रेक्षकांना ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिक्वेलकडून खूप अपेक्षा आहेत. आजच्या काळात मराठी अस्मितेवर नव्याने भाष्य करणारा हा चित्रपट आता २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.