पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर थोड्याच वेळात विमानतळावरुन पहिल्या विमानाचे उड्डाण होईल, असे सूत्रांकडून समजते. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाची औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे.
पनवेल ते उलवे दरम्यान ११०० हेक्टरवर पसरलेला ग्रीन फिल्ड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज होत आहे. विमानतळावरील अनेक कामं अंतिम टप्प्यात आहेत. या विमानतळाच्या संरक्षणाची जबाबदारी सीआयएसएफच्या जवानांकडे असेल. उद्घाटनानंतर सुरुवातीला या विमानतळावरुन इंडिगो आणि अकासा एअरलाइन्सच्या विमानसेवा सुरू होतील. लवकरच इतर कंपन्यांच्या विमान सेवांनाही सुरुवात होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. या संदर्भातील ठराव राज्य विधिमंडळाने दोन वेळा मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवला आहे. पण केंद्राचा निर्णय अद्याप आलेला नाही. आता उद्घाटनाच्या दिवशी किंवा त्याआधी तरी विमानतळाच्या नावाबाबत काही घोषणा होते का याकडे अनेकांचे लक्ष आहे.
दि. बा. पाटील यांची लोकनेते अशी ओळख आहे. नवी मुंबईतील शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. तसेच साडेबारा टक्के भूखंडासाठी दि. बा. पाटील यांनी संघर्ष केल्यामुळे हा नियम देशभरात लागू करण्यात आला. देशातील प्रकल्पग्रस्तांना दिबांच्या संघर्षामुळे फायदा झाला. त्यामुळे दिबांचे नाव विमानतळाला देण्याची प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे.