विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष
गौसखान पठाण
सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची चूरशीची निवडणूक बुधवारी (दि.१०) पार पडली. या निवडणुकीत पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले. यावेळी नगरपंचायत कार्यालयाबाहेर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि मित्रपक्ष यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष केला.
एकूण १५ नगरसेवकांच्या मतांपैकी पराग मेहता यांना नऊ मते मिळाली, तर शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके यांना पाच मते मिळाली. एक नगरसेवक तटस्थ राहिले. या निवडणुकीआधी बऱ्याच उलथापालथ झाल्या आहेत. भाजप व शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार एकमेकांसमोर थेट उभे होते. काही दिवसांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्षा व नगरसेवक यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे नगराध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे बुधवारी (दि.१०) नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून रोहा उपविभागीय अधिका ज्ञानेश्वर खुटवड यांनी काम पाहिले. तसेच पाली नगरपंचायत मुख्याधिकारी माधुरी मडके व इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.आजतागायत पाली नगरपंचायत मध्ये असंख्य राजकीय उलथापालथ होत असून, अवघ्या साडेतीन वर्षांत चौथ्या नगराध्यक्षाची निवडझाली आहे.
नगराध्यक्षपदावर सतत होणारे बदल, नगरसेवक व नगराध्यक्ष यांचे सदस्यत्व रद्द होणे, तसेच पहिल्या नगराध्यक्षांचा राजीनामा, नगरसेवक पदासाठी पोटनिवडणुक आदी घडामोडी हे सर्व पालीच्या विकासकामांसाठी घातक ठरले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके व भाजपचे पराग मेहता दोनच उमेदवार असून महायुतीमध्येच नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच झाली.
असे म्हटले जाते की निवडणुकीच्या आदल्या कोणत्या पक्षाचा नगरसेवक कुठे जाईल आणि काय करतोय याकडे पक्षश्रेष्ठी व पदाधिकारी, नेते यांचे लक्ष होते. शिवाय मतदानाच्या दिवशी पक्षादेश पाळला जाईल की नाही याकडेही सर्वांचे डोळे लागले होते. भाजपचे राज्यस्तरीय पदाधिकारी देखील या निवडणुकी कडे जातीने लक्ष देऊन होते. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे हेदेखील या सर्व प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून होते.
महायुतीतच थेट लढत
राज्य व देश पातळीवर भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) अशी महायुती एकत्र असली तरी पाली नगरपंचायतीत मात्र एकी साधली नसल्याने भाजप व शिवसेना (शिंदे गट) या दोघांत थेट लढत झाली आहे.
पक्षीय बलाबल
पाली नगरपंचायतीत एकूण १७ सदस्य असून २ सदस्यांचे सदस्यत्व काही दिवसांपूर्वी रद्द झाले आहे. सध्याची आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ५ नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) ५ नगरसेवक, भाजप ४ नगरसेवक आणि शेकाप १ नगरसेवक अशी पक्षीय बलाबल आहे.
नाटकीय घडामोडी
निवडणुकीच्या एक दिवस आधीच मंगळवारी (दि. ८) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला व भाजपचे पराग मेहता यांना पाठिंबा दर्शवला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी देखील पक्षाच्या वतीने भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचे पारडे जड झाले. मात्र त्या दिवशी काही नगरसेवक नॉट रिचेबल असल्यामुळे नक्की कोणता चमत्कार घडेल, कोण नगराध्यक्ष होईल या चर्चांना उधाण आले होते.