अश्विनी असे नाव असलेल्या आरोपीला नोएडा सेक्टर-११३ मध्ये पकडण्यात आले आणि मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल फोनही जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्याने स्वतःला पाकिस्तानमधील जिहादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगितले होते. अनेक पाकिस्तानी दहशतवादी शहरात घुसल्याचा दावा केला होता. सुरुवातीला त्याने स्वतःला ज्योतिषी असल्याचे म्हणवले आहे. परंतु पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
आरोपीने शहरात अनेक ठिकाणी 34 गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला होता. तब्बल चारशे किलो आरडीएक्स वापरून मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे एक कोटी लोकांचा जीव जाईल, असेही म्हटले होते.
धमकीत काय म्हंटले आहे?
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर, वाहतुकीबाबत तक्रारीसाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने व्हाट्सअप क्रमांक देण्यात आला होता. या क्रमांकावर शुक्रवारी एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. ज्यात १४ पाकिस्तानी भारतात घुसले असून, मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात येणार आहे. यासाठी ४०० किलो ‘आरडीएक्स’चा वापर करण्यात आला असून, सुमारे एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा दावा या संदेशात करण्यात आला आहे.
मुंबईत गणेशोत्सव अंतिम टप्प्यात असताना ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी देण्यात आल्याने पोलिस यंत्रणा गंभीर झाली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून, मुंबई पोलिसांकडून महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून, प्रत्येक वाहनांची कसून तपासणी सुरु आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देण्यास सांगितलेले आहे.