मुंबई : एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातले मोठ नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी परतला. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये १८ वर्ष राहिल्यानंतर गवळी बाहेर आला आहे. गवळीची तुरुंगातून बाहेर येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी तो पॅरोलवर अधून-मधून बाहेर यायचा. २००७ सालच्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ७६ वर्षीय अरुण गवळीला जामीन मंजूर केला. अरुण गवळी हे एकेकाळी मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातले मोठे नाव होते. थेट दाऊद, छोटा राजन, अमर नाईक या गुन्हेगारी टोळ्यांना गवळी भिडला. अरुण गवळी, छोटा राजन, दाऊद इब्राहिम यांना आजही अंडरवर्ल्ड डॉन म्हटले जाते. गुन्हेगारी विश्वात त्यांचा एक दबदबा राहिला आहे. आज पूर्वीसारखे मुंबई अंडरवर्ल्ड सक्रीय नाही. गुन्हेगारी टोळ्यांची ताकद संपुष्टात आली आहे. मात्र भायखळा दक्षिण मुंबईच्या भागात आजही अरुण गवळीच्या नावाचा दरारा कायम आहे.
अरुण गवळीच्या तुरुंगातून बाहेर येण्याच्या वेळेकडे राजकीय जाणकार लक्ष वेधत आहेत. पुढच्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याआधी अरुण गवळी बाहेर आला आहे. अरुण गवळी भायखळ्यातल्या साडे तीन लाख मतदारांवर प्रभाव टाकणार का? अशी चर्चा आहे. भायखळा हा अरुण गवळीचा बालेकिल्ला मानला जातो. गवळी तुरुंगात असताना त्याची मुलगी गीता गवळीने सातत्याने या भागातून महानगर पालिकेची निवडणूक जिंकली आहे.
अरुण गवळी स्वत: अपक्ष आमदार राहिला आहे. २००४ साली चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून त्याने अपक्ष निवडणूक जिंकली होती. त्याआधी लोकसभा निवडणुकीत त्याने तब्बल ९२ हजार मते मिळवली होती. कमलाकर जामसांडेकर खून खटल्यात तुरुंगात गेल्यानंतर अरुण गवळीचा तसा राजकारणाशी थेट संबंध राहिला नाही. पण त्याची मुलगी त्या भागातून सतत निवडणूक जिंकत आहे. गवळीच्या अखिल भारतीय सेनेने महापालिकेत नेहमी शिवसेनेला साथ दिली. पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत गवळीची साथ कोणाला मिळते? याची उत्सुक्ता आहे. कारण अरुण गवळी आता या भागात सक्रीय नसला, तरी त्याचा प्रभाव काही प्रमाणात आहे. यंदाची निवडणूक उद्धव ठाकरे गट आणि भाजप दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे. ठाकरे बंधुंच या निवडणुकीत सर्वच पणाला लागले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दक्षिण मुंबईत अरुण गवळी महायुतीला साथ देणार की, महाविकास आघाडीला यावर अनेक राजकीय गणिते अवलंबून आहेत.