पुणे: पुणे पोलिसांनी (Pune Police) गुरुवारी ४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान विसर्जित केलेल्या गणेश मूर्तींचे फोटो आणि व्हिडिओ चित्रित करणे तसेच ते सोशल मिडियावर सार्वजनिक करणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. जेणेकरून गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत आणि सार्वजनिक शांतता राखली जाईल हा त्यामागचा हेतू आहे.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले. उद्या अनंत चतुर्दशी असून, शनिवारी पुण्यातील अनेक गणेश मूर्तींचे विसर्जन वेगवेगळ्या तलावात केले जाईल. त्यानंतर विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्यांचे अवशेष सोशल मिडियावर पोस्ट केले जातात, ज्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात.
त्यामुळे पुणे पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या (BNS) संबंधित कलमांखाली कडक कारवाई केली जाईल.