
हलाल लाइफस्टाइल टाऊनशिपची जाहिरात विकासकाने हटवली
नेरळ : नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत हलाल लाइफस्टाइलचा उल्लेख केल्यानंतर राजकीय धुराळा उडाला आहे. कथित जाहिरातीमध्ये हलाल जीवनशैलीचा पुरस्कार केला जात आहे. धर्माच्या नावाखाली एका विशिष्ट बाबीला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांचे सत्र सुरू आहे. टीकेची झोड उठल्यानंतर संबंधित विकासकाने ही कथित जाहिरात सोशल मीडियावरून हटवली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे (एनसीपीरसीआर) माजी अध्यक्ष प्रियांक कानूंगो यांनी त्यांच्या एक्स हँडलवर या जाहिरातीचा व्हिडीओ टाकला आहे. ट्वीटमध्ये त्यांनी ‘नेशन विदिन द नेशन’ असा उल्लेख करून एका राष्ट्राच्या आत दुसरे राष्ट्र निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.
सदर व्हिडीओ प्रियांक कानूंगो यांनी टाकताना या व्हिडीओमध्ये हिजाब परिधान केलेली मॉडेल गृहप्रकल्पाची माहिती देताना दिसते. “एखाद्याला समाजात आपली मूल्य, परंपरांशी तडजोड करावी लागत असेल तर ते योग्य आहे का? आमच्या गृहप्रकल्पात समान विचारांचे लोक राहतात. हलाल वातावरणात तुमची मुले वाढतील. वृद्धांना इथे आदर आणि प्रेम मिळेल. इथे प्रार्थनेसाठी विशिष्ट जागा असून सामाजिक उपक्रमांसाठीही विशेष सोय केलेली आहे. ” अशी बतावणी जाहिरातीत करण्यात आली आहे. कानूंगो यांनी महाराष्ट्र सरकारला याबद्दल नोटीस पाठवल्याचे सांगितल्याचे कळते.
विकासकांवर कठोर कारवाईची मागणी
ही कथित जाहिरात व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या आहेत. भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी हा प्रकल्प 'गजवा-ए-हिंद'चा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. अशा गृहप्रकल्पांना मुंबई किंवा महाराष्ट्रात कुठेही स्थान नाही, संविधानाच्या धर्मनिरपेक्ष रचनेला सदर प्रकल्प आव्हान देत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी विकासकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तसेच शिवसेनेचे (शिंदे) प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी प्रकल्पाच्या जाहिरातीवर आक्षेप घेत ही जाहिरात मागे घेण्याची मागणी केली. अशा धार्मिक जाहिरातबाजीमुळे समानतेच्या संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन होत आहे का? याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.