
मनमाड : विवाहानंतर पहिल्यांदाच माहेराहून रेल्वेने सासरी परतणाऱ्या विवाहितेने सासू सासऱ्यांना गुंगारा देत प्रियकरासमवेत पळ काढला. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी संशयित प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून, चौकशीत ही विवाहिता अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वाशिम जिल्ह्यात शेतमजुरी करणाऱ्या पित्याने व माडसांगवी येथील सासऱ्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सदर मुलीचा विवाह नाशिक तालुक्यातील माडसांगवी येथील युवकाशी झाला. विवाहानंतर पहिल्या सणाला माहेरी आलेल्या विवाहितेस सासरी परत नेण्यासाठी तिचे सासू-सासरे विदर्भ एक्स्प्रेसने नाशिककडे येत होते. मनमाड येथे गाडी थांबल्यावर आपण बाथरूममध्ये जाऊन कपडे बदलून येते, असे सांगून ही नवविवाहिता बेपत्ता झाली.
या प्रकरणी तिच्या सासऱ्यांनी मनमाड पोलीस ठाण्यात सूनबाई हरवली असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास करीत तिच्यासह एका युवकास पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत मुलगी व युवकाचे प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले, तसेच ही मुलगी अल्पवयीन असल्याचेही निदर्शनास आले.
तर मुलीच्या पित्याने मनमाडला धाव घेत आपल्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवित युवकाने पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.