मुंबई: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र (३६, ११, ८७२.५ एकर) शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत. १५ ते २० ऑगस्टदरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे हे नुकसान झाले आहे.
या नुकसानीमध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर आणि मूग यांसारख्या प्रमुख खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. याशिवाय, भाजीपाला, फळे, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेड, वाशीम, यवतमाळ, धाराशिव आणि बुलढाणा यांचा समावेश आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात ६.२० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.