विजयदुर्ग : कोकणात आता बोटीने जाता येणार आहे. सागरी रो-रो बोट सेवेची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेली मुंबई ते विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू झाली आहे. दरम्यान कोकणवासीयांसाठी आता येत्या काही दिवसात रो-रो सर्विस पँसेजरना घेऊन मुंबई -विजयदुर्ग- मुंबई अशी सेवा सुरु होईल असे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता विजयदुर्ग ग्रामपंचायत आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने एम टू एम प्रिन्सेस रो रो बोटीचे कप्तान मृत्युंजय सिंग यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ही रोरो बोट विजयदुर्ग बंदरातील नवीन जेटीवर दाखल झाली होती. मात्र सदर बोटीसाठी बांधण्यात आलेल्या रोपेक्स जेटीवर बोट लावण्यासाठी पाण्याची पुरेशी उंची नसल्याने ती जेटीवर व्यवस्थित उभी राहू शकली नव्हती. त्यामुळे जेटीपासून साधारण एक कि. मी. अंतरावर खाडीत ही बोट उभी करण्यात आली.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता एम टू एम प्रिन्सेस विजयदुर्ग येथील नवीन रोपेक्स जेटीवर सुव्यवस्थित उभी करण्यात आल्यावर बोटीचे कप्तान मृत्युंजय सिंग आणि कर्मचाऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी कप्तान मृत्युंजय सिंग यांनी मान्यवरांना बोट आतून फिरवून दाखवली. अर्ध्या तासाच्या स्वागतानंतर सदर रोरो बोट मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. दरम्यान, बोटीचा प्रवास आणि जेटीवरील लँडिंग चाचणी व्यवस्थित झाल्याने बोट सेवा चालू होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे विजयदुर्गवासियांमधून तसेच जिल्ह्यातील सर्वच कोकणवासीयांकडून समाधान व्यक्त होत असून विशेष करून मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे जाहीर आभार मानण्यात येत आहेत.
सहा तासात मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास शक्य : चाचणीही यशस्वी
एम टू एम प्रिन्सेस या बोटीमध्ये विजयदुर्ग जेटीवरून तीन गाड्या बोटीमध्ये चढवून त्या पुन्हा बाहेर काढण्यात आल्या. त्यामुळे ही तिसरी चाचणीही यशस्वी पार पडली आहे. आता फक्त सर्वांना प्रतीक्षा आहे ती बोट चालू होण्याची! यावेळी कप्तान मृत्युंजय सिंग यांनी दै. प्रहारशी बोलताना सांगितलं की, सहा तासात मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास शक्य होणार आहे. दरम्यान, या बोटीमध्ये १८ कर्मचारी असून या कर्मचाऱ्यांकडून बोटीतील प्रवाशांना विनम्र सेवा मिळणार आहे. काही किरकोळ त्रुटी दोन दिवसात मार्गी लागणार आहेत असे यावेळी कॅप्टन मृत्युंजय सिंग आणि बंदर अधिकारी उमेश महाडिक यांनी सांगितलं. यावेळी बोलताना जिल्हा भाजप उपाध्यक्ष बाळा खडपे यांनी सांगितलं की, ३८ ते ४० वर्षानंतर पुन्हा एकदा बोटीच्या माध्यमातून कोकणचा मुंबईशी समुद्रमार्गे संपर्क होणार आहे आणि नवीन पिढीसाठी हा अतिशय आनंददायी योग आहे.